Surabhi Jayashree Jagdish
डोळ्यांच्या रंगीत भागाभोवती फिकट करडे किंवा पांढऱ्या रंगाचे वर्तुळ दिसू लागल्यास त्याला 'कॉर्नियल आर्कस' असं म्हणतात. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हे वाढत्या वयामुळे असू शकतंय पण तरुणांमध्ये हे उच्च कोलेस्ट्रॉलचे सुरुवातीचे लक्षण ठरू शकते.
कॉर्नियाच्या बाहेरील भागात चरबीचे सूक्ष्म थर साचल्यामुळे हे वर्तुळ तयार होतं. यामुळे डोळ्यात वेदना होत नाहीत किंवा दृष्टीवर कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे अनेकजण या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात.
घोटे, सांधे किंवा टेंडनजवळ त्वचेखाली मऊ आणि पिवळसर रंगाच्या छोट्या गाठी दिसू शकतात. या गाठींना 'झँथोमा' असं म्हणतात आणि त्या शरीरात जास्त प्रमाणात चरबी साचल्याचं लक्षण असू शकतात.
रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल त्वचेखाली जमा झाल्यावर या गाठी तयार होतात. या गाठी सहसा वेदनारहित असतात. त्यामुळे अनेकदा त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. मात्र त्या दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणं गरजेचं असतं.
कुटुंबात हृदयाच्या समस्यांचा इतिहास असल्यास किंवा जन्मापासूनच कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास ही लक्षणं अधिक महत्त्वाची ठरतात. अशा व्यक्तींमध्ये डोळ्यांतील वर्तुळ किंवा घोट्यांजवळील गाठी ही गंभीर इशारा देणारी लक्षणं असू शकतात.
अनेक लोक डोळ्यांभोवतीचे वर्तुळ हे वाढत्या वयाचं लक्षण समजतात किंवा घोट्यांजवळील गाठी त्वचेची साधी समस्या समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलचं निदान उशिरा होऊ शकतं आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
कोलेस्ट्रॉलची तपासणी ही साध्या रक्तचाचणीद्वारे करता येते आणि त्यामुळे शरीरातील चरबीची पातळी समजू शकते. वेळेत निदान झाल्यास संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि गरजेनुसार औषधांच्या मदतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येते.