Surabhi Jayashree Jagdish
जागेपणातून झोपेच्या अवस्थेत जाताना शरीरात अनेक शारीरिक बदल घडतात. यादरम्यान हात-पाय किंवा शरीराच्या एखाद्या भागातील स्नायू अचानक आकुंचन पावल्याने झटका जाणवू शकतो. या प्रकाराला हायपनिक जर्क म्हणतात.
दिवसभर खूप शारीरिक किंवा मानसिक मेहनत झाल्यानंतर अशा झटक्यांची शक्यता वाढू शकते. विशेषतः शरीराला पुरेशी विश्रांती मिळाली नसेल, तर झोपेत जाण्याच्या वेळी हा अनुभव अधिक जाणवतो.
जास्त ताण किंवा सतत चिंता करत राहिल्याने मेंदू आणि शरीराची विश्रांतीची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. अशा स्थितीत झोप लागण्याच्या वेळी स्नायूंमध्ये अचानक हालचाल होण्याचं प्रमाण काही लोकांमध्ये वाढू शकतं.
दररोज कमी वेळ झोपणं किंवा झोपेची वेळ सतत बदलत राहणं यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडू शकते. झोपेची कमतरता असल्यास हायपनिक जर्क अधिक वारंवार जाणवू शकतो. शक्यतो प्रौढ व्यक्तींनी नियमित वेळापत्रक ठेवून दररोज साधारण ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा.
रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीन वापरल्याने झोपेची वेळ पुढे ढकलली जाऊ शकते. विशेषतः झोपेच्या अगोदर सतत कंटेंट पाहिल्याने मन शांत होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करून नियमित आणि शांत झोपेची सवय लावणे फायदेशीर ठरते.
झोप लागताना अधूनमधून एक-दोन वेळा झटका जाणवणं सामान्य असू शकतं. केवळ या एका लक्षणावरून एपिलेप्सी किंवा इतर न्यूरोलॉजिकल आजार असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही.
झटके अचानक खूप वाढणं, त्यासोबत बेशुद्ध पडणं, जीभ चावली जाणं, लघवीवर नियंत्रण न राहणं किंवा जागं झाल्यानंतर गोंधळल्यासारखं वाटणं अशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष करू नये. अशा वेळी हायपनिक जर्क आहे असं गृहीत न धरता डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.