Surabhi Jayashree Jagdish
भात शिजवताना सर्वात जास्त गोंधळ पाण्याचं प्रमाण आणि कुकरच्या शिट्ट्यांबाबत होतो. कधी भात जास्त शिजून मऊ होतो तर कधी त्याचे दाणे कच्चे राहतात. तुम्हाला मोकळा, थोडा ओलसर किंवा जास्त शिजलेला भात हवा असेल तर त्यानुसार पाणी आणि शिजवण्याचा वेळ ठरवावा लागतो.
भाताचे दाणे एकमेकांना चिकटू नयेत आणि वेगवेगळे राहावेत असं वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावं. बासमती तांदळासाठी साधारण एक कप तांदळामागे दीड कप पाणी वापरता येतं. भात शिजवण्यापूर्वी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत त्यामुळे त्यावरील अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि भात कमी चिकटतो.
कुकरमध्ये तांदूळ आणि पाणी घातल्यानंतर योग्य वेळेपर्यंत भात शिजवावा. पांढरा बासमती तांदूळ प्रेशरमध्ये साधारण ३ ते ४ मिनिटं शिजवावा. भात शिजल्यानंतर कुकरमधील वाफ हळूहळू बाहेर जाऊ द्यावी आणि कुकर उघडल्यानंतर काट्याने हलक्या हाताने भाताचे दाणे मोकळे करावेत.
तुम्हाला भात थोडा मऊ आणि ओलसर आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवावं. तांदूळ जितके पाणी शोषून घेतो त्यानुसार भाताचा मऊपणा ठरतो. पाणी खूप जास्त घातल्यास भात जास्त शिजून चिकट होऊ शकतो. त्यामुळे बासमती, जास्मिन आणि ब्राऊन राईस या प्रकारांनुसार पाण्याचं प्रमाण ठरवावं.
घरातील कोणाला जास्त मऊ आणि व्यवस्थित शिजलेला भात आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवा. ब्राऊन राईसला पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त पाणी आणि शिजवण्यासाठी अधिक वेळ लागतो. ब्राऊन राईस साधारण १२ ते १५ मिनिटं तर जास्मिन राईस ४ ते ५ मिनिटं प्रेशरमध्ये शिजवता येतो.
भात शिजवण्यासाठी किती शिट्ट्या द्यायच्या हे कुकरचा प्रकार आणि तांदळाच्या प्रकारावर अवलंबून असतं. साधारणपणे पांढऱ्या तांदळासाठी १ ते २ शिट्ट्या पुरेशा ठरू शकतात तर ब्राऊन राईससाठी ३ ते ४ शिट्ट्या लागू शकतात. नवीन प्रकारचा तांदूळ पहिल्यांदा शिजवत असाल तर थोड्या प्रमाणात भात करून पाणी आणिंशिट्ट्यांचे योग्य प्रमाण समजून घ्या.
कुकरमध्ये तांदूळ घालण्यापूर्वी तो पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. वेळ असल्यास तांदूळ काही वेळ पाण्यात भिजत ठेवू शकता, त्यामुळे तो लवकर शिजण्यास मदत होते. कुकरमध्ये पाणी जास्त घातल्यास भात ओलसर आणि चिकट होऊ शकतो.