Shreya Maskar
साऊथ स्टाइल सांबार बनवण्यासाठी अरहर डाळ, भाज्या (शेवगा, भोपळा, गाजर, दुधी भोपळा), कांदे, टोमॅटो, चिंचेचा गर, हळद , सांबार मसाला, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग , लाल मिरची पूड, तेल किंवा तूप , मीठ आणि गूळ इत्यादी साहित्य लागते.
साऊथ स्टाइल सांबार बनवण्यासाठी सर्वप्रथम अरहर डाळ स्वच्छ धुवून प्रेशर कुकरमध्ये घाला. त्यात हळद, मीठ आणि ३ कप पाणी घालून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ गुळगुळीत होईपर्यंत चांगली मॅश करा.
एका मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि इतर सर्व चिरलेल्या भाज्या घाला. थोडे मीठ आणि एक कप पाणी घाला. झाकण ठेवून भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा.
भाज्या शिजल्यावर त्यात चिंचेचा गर, सांबार मसाला, लाल मिरची पूड आणि गुळाचा एक तुकडा घालून मंद आचेवर ५ मिनिटे उकळू द्या.
आता या उकळत्या मिश्रणात मॅश केलेली डाळ घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा. सांबार खूप घट्ट वाटल्यास थोडे गरम पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
चवी एकजीव होण्यासाठी सांबार मंद आचेवर ८-१० मिनिटे शिजू द्या. आता सांबारला तडका द्या.
फोडणीसाठी एका लहान पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडू लागल्यावर सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता घाला. कढीपत्ता कुरकुरीत झाल्यावर ही फोडणी लगेच उकळत्या सांबारमध्ये घाला आणि भांडे २ मिनिटांसाठी झाकून ठेवा.
अशाप्रकारे गरमागरम साऊथ स्टाइल मसालेदार सांबार तयार झाला आहे. इडली, डोसा , उत्तपम आणि मेंदू वड्यासोबत आस्वाद घ्या.