Shreya Maskar
नळदुर्ग किल्ला तुळजापूर तालुका, धाराशिव जिल्ह्यात आहे. नळदुर्ग किल्ला बोरी नदीच्या काठावर वसलेला आहे. किल्ला नदीच्या खोऱ्यातील बेसॉल्ट खडकाच्या उंचवट्यावर वसलेला आहे.
नळदुर्ग किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे धरणाच्या बांधकामातच तयार केलेला पाणी महाल. सामान्यतः राजवाडे किंवा महाल हे स्वतंत्र वास्तू म्हणून बांधलेले दिसतात; परंतु येथे नदीवर बांधलेल्या धरणाच्या मध्यभागी महालाची रचना करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आदिलशाहीच्या काळात धरणाच्या बांधकामाची सुरुवात इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या कारकिर्दीत पूर्णत्वाकडे गेली. पाणी महालातील शिलालेखाचा संदर्भ इ.स. १६१३ या वर्षाशी जोडला जातो. धरणाचे बांधकाम मात्र अनेक वर्षे सुरू होते.
नळदुर्ग किल्ल्यात पाणी महाल बांधण्यामागे पाण्याचे व्यवस्थापन, किल्ल्याची संरक्षणव्यवस्था आणि राजघराण्याच्या विश्रांतीसाठी जागा निर्माण करणे, हे प्रमुख हेतू होते. म्हणूनच हा महाल केवळ सुंदर वास्तू नसून मध्ययुगीन जलअभियांत्रिकी आणि दुर्गरचनेचा महत्त्वाचा नमुना आहे.
पावसाळ्यात धरणातून वाहणारे पाणी महालाच्या परिसरात धबधब्यासारखे दृश्य निर्माण करते. धरण आणि पाणी महालाची रचना किल्ल्याला रणमंडळ या संबंधित दुर्गभागाशी जोडते.
पावसाळ्यात जेव्हा बोरी नदीवरील धरण ओसंडून वाहते, तेव्हा पाण्याचे प्रवाह विशाल खडकाळ भिंतींवरून खाली कोसळतात. स्थानिक पातळीवर हे दोन स्वतंत्र प्रवाह 'नर' आणि 'मादी' म्हणून ओळखले जातात.
नळदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशन जवळ आहे. सोलापूरहून तुम्ही रिक्षाने किल्ल्याजवळ पोहचू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.