Shreya Maskar
हिवाळा हा कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी उत्तम काळ आहे. आल्हाददायक हवामान, निळाशार समुद्र, स्वच्छ किनारे आणि ऐतिहासिक किल्ले यामुळे मालवण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतं. मालवण हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किनारपट्टीचे शहर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ ते १६६७ या काळात बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रातील कुरटे बेटावर आहे. बोटीने किल्ल्यावर जाता येतं. किल्ल्याची भव्य तटबंदी, ऐतिहासिक वास्तू आणि समुद्राचं विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करतं.
तारकर्ली बीच हा मालवणमधील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. इथली स्वच्छ वाळू, निळंशार पाणी आणि शांत वातावरण मन प्रसन्न करतं. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि इतर जलक्रीडांचा आनंदही येथे घेता येतो.
देवबाग येथे करली नदी आणि अरबी समुद्राचा सुंदर संगम पाहायला मिळतो. नदीचं शांत पाणी, समुद्रकिनारा आणि वाळूचे पट्टे यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खास आहे. बोटिंग आणि डॉल्फिन सफारीसारख्या अनुभवांसाठीही पर्यटक येथे येतात.
मालवणमधील चिवला बीचजवळ असलेलं रॉक गार्डन हे सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. समुद्राच्या लाटांनी तयार झालेल्या खडकाळ किनाऱ्यावरून अथांग समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. संध्याकाळी कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
चिवला बीच हा मालवणमधील शांत आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. येथील स्वच्छ वाळू, नारळाची झाडं आणि समुद्राच्या लाटांचा आवाज पर्यटकांना आकर्षित करतो. सकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी किंवा संध्याकाळी सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी येथे नक्की भेट द्या.
देवबागजवळ करली नदीच्या मुखाशी असलेलं त्सुनामी आयलंड हे पर्यटकांचं आवडतं आकर्षण आहे. पाण्याच्या पातळीनुसार दिसणारे वाळूचे पट्टे आणि सभोवतालचं निसर्गसौंदर्य येथे अनुभवता येतं. बोटिंग आणि उपलब्धतेनुसार विविध जलक्रीडांचा आनंद घेता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.