Shreya Maskar
समोशाचे पीठ मळण्यासाठी एका बाऊलमध्ये मैदा, मीठ, ओवा, तूप आणि पाणी टाकून कणिक मळून घ्या. तुपामुळे पीठ मऊ होते. पीठ जितके घट्ट तितके समोसे कुरकुरीत होतील. आता पीठ कापडाने झाकून अर्धा तास राहू द्या.
समोशाच्या मसाला बनवण्यासाठी बाऊलमध्ये उकडलेले बटाटे किसून घ्या. यात लाल मिरची, धणे पावडर, चाट मसाला, हळद, मीठ, गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून चांगले मिक्स करा.
मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात कोथिंबीर आणि चिरलेली हिरवी मिरची घाला. तुम्ही यात शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता. त्यानंतर मसाला ५ मिनिटांसाठी ठेवून द्या.
आपण बटाट्याचे स्टफिंग जेव्हा रोलमध्ये टाकतो तेव्हा ते तळताना बाहेर सांडण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी बटाट्याच्या मिश्रणात तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. तांदळाचे पीठ बटाट्यांमधील ओलावा शोषून घेते आणि तळताना तेलात भरलेले पदार्थ उडण्यापासून रोखते.
आता पीठाचा एक गोळा मोठा लाटून घ्या. रोटी खूप पातळ किंवा जास्त जाड नसल्याची खात्री करा. कोणत्याही सुक्या पिठाशिवाय रोल केल्याने समोशाची पोत चांगली होते.
चपातीच्या मध्यभागी एक लहान वाटी ठेवा. वाटीभोवती बटाट्याच्या मसाल्याचा पातळ थर पसरवा. त्यानंतर वाटी काढून चाकू्च्या मदतीने पिझ्झाप्रमाणे चपातीचे 16 समान भाग करा. रिकाम्या मध्यभागी थोडे पाणी लावून गुंडाळी करा. अशा पद्धतीने 16 समोसे रोल तयार करा.
तयार समोसे रोल 10-15 मिनिटे बाजूला ठेवून द्या. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून समोसे खरपूस तळून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा.
कुरकुरीत गोल्डन फ्राय झाले की समोसे काढा. जास्त आचेवर तळल्याने समोसे बाहेरून शिजतील पण आतून कच्चे राहतील. समोसा रोलचा पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.