Bharat Jadhav
चांदीचे पैंजण किंवा जोडवी कधीकधी अचानक काळी पडतात आणि त्यांची चमक कमी होते. दागिन्यांवरील चमक कमी झाल्यानं ते सण-समारंभाच्या वेळी घालू वाटत नाही. अशावेळी, असे का घडते याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. दागिने पुन्हा नव्या सारखी कशी करायची, हे कळत नाही.
चांदीची चमक जाणे किंवा ती काळी पडणे ही एक नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया आहे. जेव्हा चांदी हवेतील गंधक (सल्फर) किंवा हायड्रोजन सल्फाइड वायूच्या संपर्कात येते, तेव्हा त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते. आणि चांदीच्या पृष्ठभागावर 'सिल्व्हर सल्फाइड'चा काळा थर तयार होतो, यामुळे चांदीचे पैंजण काळे पडतात.
दररोजच्या वापरामुळे चांदीचे पैंजण आणि जोडवी यांची चमक कालांतराने कमी होत जाते आणि ती जुनी किंवा वापरलेली वाटू लागतात. त्यामुळे अनेकदा स्त्रिया ती घालणे टाळतात. त्यामुळे, हे साधे घरगुती उपाय करून ते पुन्हा चमकदार बनवता येतील.
ॲल्युमिनियम फॉइल, बेकिंग सोडा आणि गरम पाण्याचा वापर करून तुम्ही घरीच काळ्या पडलेल्या चांदीची चमक सहजपणे परत मिळवू शकता. यासह डिटर्जंट पावडर किंवा टूथपेस्ट वापरूनही चांदीवरील काळेपणा सहजपणे दूर करता येतो.
जर तुमच्या पैंजणांची किंवा जोडव्यांची चमक कमी झाली असेल, तर बेकिंग सोडा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी, एका भांड्यात थोडे कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून घट्ट पेस्ट तयार करा.
आता, मऊ कापड किंवा ब्रशच्या साहाय्याने ही पेस्ट दागिन्यांवर लावा. काही मिनिटे तसेच राहू दिल्यानंतर, हलक्या हाताने घासायला सुरुवात करा. तुम्हाला दिसेल की त्यावरील घाण आणि काळेपणा निघून जाऊ लागेल आणि चांदीची चमक परत येऊ लागेल.
चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी साबण आणि कोमट पाण्याचा वापर करणे ही देखील एक सोपी पद्धत आहे. आधी पाणी थोडे कोमट करा आणि त्यात दागिने काही काळ भिजत ठेवा. त्यानंतर, सौम्य साबण लावून त्या वस्तू हळुवारपणे स्वच्छ करा.