Surabhi Jayashree Jagdish
स्वयंपाकघरात अनेक वस्तू असतात, ज्यांची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. काही घरांमध्ये जागा कमी असल्यामुळे गॅस सिलिंडर आणि फ्रिज जवळ ठेवले जातात. मात्र, या दोन्ही वस्तू जवळ ठेवणं सुरक्षित आहे की नाही, याचा विचार करणं आवश्यक आहे.
स्वयंपाकघरात जागा कमी असल्यामुळे अनेकजण फ्रिज आणि गॅस सिलिंडर एकमेकांच्या जवळ ठेवतात. मात्र काही परिस्थितींमध्ये असं करणं धोकादायक ठरू शकतं. गॅस लीक होत असल्यास आग लागण्याचा धोका लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
फ्रिजमध्ये कॉम्प्रेसर आणि इतर विद्युत भाग असतात. फ्रिज सुरू होताना किंवा बंद होताना काही विद्युत भागांमध्ये ठिणगी निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी गॅस सिलिंडरमधून गॅस गळत असेल आणि तो ठिणगीच्या संपर्कात आला, तर आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
फ्रिजमधील कॉम्प्रेसर फ्रिज थंड ठेवण्यासाठी काम करतो. कॉम्प्रेसर सुरू असताना फ्रिजच्या मागील बाजूने उष्णता बाहेर पडते. त्यामुळे फ्रिज ठेवताना त्याच्या मागील बाजूला पुरेशी मोकळी जागा ठेवावी आणि गॅस सिलिंडरला उष्णतेपासून दूर ठेवावं.
गॅस सिलिंडर जास्त गरम झाल्यास त्यातील गॅसचा दाब वाढू शकतो. त्यामुळे सिलिंडर उष्णतेच्या स्रोतांपासून दूर ठेवणं आवश्यक आहे. याच कारणामुळे फ्रिजच्या गरम होणाऱ्या मागील भागाला सिलिंडर अगदी लागून ठेवू नये.
फ्रिज आणि गॅस सिलिंडर यांच्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे. या दोन्ही वस्तूंमध्ये ५ ते ६ फूट अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. सिलिंडर हवेशीर जागी ठेवावा आणि त्यावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
गॅस सिलिंडरजवळ मायक्रोवेव्हसारखी विद्युत उपकरणं ठेवताना योग्य अंतर आणि सुरक्षिततेचे नियम पाळणं आवश्यक आहे. सिलिंडरच्या आसपास गॅस साचू नये म्हणून त्या जागेत हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी.