Surabhi Jayashree Jagdish
निरोगी राहण्यासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. सफरचंदात फायबर आणि शरीरासाठी उपयुक्त पोषक घटक असतात. रोज सफरचंद खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर असतात जे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यास मदत करू शकते. रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमा होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात सफरचंदाचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.
सफरचंदासारखी फायबरयुक्त फळं खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र केवळ सफरचंद खाल्ल्याने हार्ट अटॅक टळतीलच असं नाही. त्यासाठी संतुलित आहार घेणं , नियमित व्यायाम करणं आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणंही महत्त्वाचं आहे.
‘द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात दररोज दोन सफरचंद खाणाऱ्या व्यक्तींच्या बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडच्या पातळीत घट झाल्याचे आढळलं. ट्रायग्लिसराइड हा रक्तातील चरबीचा एक प्रकार असून, त्याचे प्रमाण जास्त असल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
सफरचंदातील फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी सफरचंदासोबत पुरेसं पाणी पिणं आणि इतर फायबरयुक्त पदार्थ खाणंही आवश्यक आहे.
सफरचंदात नैसर्गिक साखर असते, पण त्यातील फायबरमुळे साखरेचं शरीरातील शोषण तुलनेने मंदावण्यास मदत होऊ शकते. संपूर्ण सफरचंद खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहू शकतं आणि वारंवार भूक लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही आहारात सफरचंदाचा समावेश करता येतो.
सफरचंद स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन सालीसह खाल्ल्यास त्यातील फायबरचा अधिक फायदा मिळू शकतो. हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सफरचंदासोबत इतर फळं आणि भाज्या खाणं, नियमित व्यायाम करणं, धूम्रपान टाळणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोलेस्ट्रॉलची तपासणी करणंही महत्त्वाचं आहे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.