Manasvi Choudhary
रात्रीच्या जेवणानंतर अनेक घरांमध्ये दोन-तीन चपात्या शिल्लक राहतात. अशा वेळी चपात्या वाया जाऊ नये म्हणून त्या डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवण्याची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गरम करून खाण्याची सवय अनेकांना असते. पण, खरोखरच उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवून पुन्हा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
आरोग्य आणि आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिळ्या चपात्या खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. यामागचे कारण आणि चपात्या शिळ्या होण्यापासून वाचवण्याच्या सोप्या टिप्स सविस्तर जाणून घेऊया:
आयुर्वेदानुसार, शिळे अन्न पचायला जड असते. सतत शिळ्या चपात्या खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि गॅस, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास वाढू शकतो.
फ्रिजमधील चपात्या पुन्हा गरम केल्यावर त्या वरून गरम होतात, पण आतील भाग कडक व थंडच राहतो, जो आरोग्यासाठी योग्य नाही.
गरमागरम चपाती तव्यावरून उतरवताच लगेच हवाबंद डब्यात ठेवू नका. वाफेमुळे निर्माण होणाऱ्या ओलाव्यामुळे चपात्या चिकट किंवा कडक होऊ शकतात. चपातीचे तापमान थोडे सामान्य होऊ द्या.
चपात्या बनवल्यानंतर त्या एका स्वच्छ पातळ सुती कापडामध्ये (Cotton Cloth) गुंडाळून स्टीलच्या डब्यात ठेवा. यामुळे हवा खेळती राहते आणि चपात्या १० ते १२ तास अगदी मऊ आणि ताज्या राहतात.
चपात्यांचा ओलावा टिकून राहण्यासाठी नेहमी हवाबंद स्टील किंवा काचेच्या डब्याचा वापर करा, ज्यामुळे त्या लवकर सुकत नाहीत.
चपाती मऊ राहावी म्हणून पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा आणि मळलेले पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. यामुळे चपात्या दीर्घकाळ मऊ राहतात.
जर परिस्थितीत चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्याच लागल्या, तर त्या सुती कापडात व्यवस्थित गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवा. तसेच खाण्याच्या अर्धा तास आधी त्या बाहेर काढून सामान्य तापमानावर येऊ द्या आणि मगच गरम करा.