ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वायू प्रदुषणामुळे देशातील महानगरांमध्ये श्वास घेमे कठीण झाले आहे. हवेतील प्रदुषणामुळे श्वसनाचे विकार होतात, फुफुसे कमजोर होतात अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. मात्र नव्या संशोधनानुसार या प्रदुषणामुळे मेंदुलाही धक्का पोहोचतो असे धक्कादायक निष्कर्ष वैद्यकीय तज्ञांनी काढले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या काळात आपल्या मेंदूला काही आजार झाला आहे हे लक्षात येत नाही. वायू प्रदूषणामुळे मेंदूच्या प्रत्येक भागावर घातक परिणाम होतो. विस्मरणापासून ते मेंदूतील रक्तसत्त्रावापर्यंत हे प्रकरण जाते.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदुषित शहरांमध्ये आपण मेंदुचा धोका घेऊन वावरत असतो. प्रदुषित हवेतील कण मेंदुचा ताबा घेतात. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रदूषित हवेत बाहेर पडताना एन ९५ सारखे मास्क घालून फिरणे. बेडरूममध्ये हवा शुद्ध करणारे यंत्र बसवावे. घर सातत्याने स्वच्छ ठेवावे. ओमेगा ३ चा समावेश असणारा आहार घ्यावा. तसेच सतत डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्रदूषित हवा हळूहळू मेंदूच्या रक्तस्त्रावाचे कारण बनते. घातक कण रक्तात गेल्यामुळे रक्त जाड होते. रक्तवाहिन्या कडक होतात आणि रक्तात गुठळ्या होतात. त्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव होऊ शकतो.
लहान मुले जलद गतीने श्वास घेतात. अधिकवेळ बाहेर घालवतात. त्यामुळे प्रदूषित हवेचा त्यांच्यावर परिणाम होतो मुले अधिक काळ प्रदूषित हवेत राहिल्यास त्यांचा बुद्ध्यांक कमी होतो.
प्रदूषित हवेतील घातक कण मेंदूला ईजा पोहोचवत असल्याने त्याचा मानसिक परिणामही होतो.माणूस सतत चिंतेत दिसतो नैराश्य येते, चिडचिड होते, झोप पुरेशी होत नाही.