Surabhi Jayashree Jagdish
सचिनने लोणावळ्यात तीन वेगवेगळ्या व्यवहारांमधून ३.९ एकरांपेक्षा जास्त जमीन विकत घेतलीये. या सगळ्या जमिनीचं एकूण क्षेत्रफळ १५,६०१.७८ चौरस मीटर म्हणजेच जवळपास १.६८ लाख चौरस फूट इतकं आहे. यातील एका जमिनीवर आधीपासूनच सुमारे २,१०० चौरस फुटांचं बांधकामही आहे.
सचिनच्या या तीनही जमीन व्यवहारांची नोंदणी ४ सप्टेंबर रोजी झाल्याची माहिती आहे. या जमिनी लोणावळ्यातील H वॉर्डमधील चार वेगवेगळ्या सिटी सर्व्हे क्रमांकांमध्ये येतात. म्हणजेच सचिनने एकाच ठिकाणी एकच व्यवहार न करता वेगवेगळ्या जमिनींचे तीन व्यवहार केलेत.
या तीन व्यवहारांमध्ये सर्वात मोठी डील तब्बल ६३.६९ कोटी रुपयांची आहे. या पैशांमध्ये सचिनने जवळपास ३.०९ एकर जमीन घेतली आहे आणि या जमिनीवर आधीपासूनच सुमारे २,१०० चौरस फुटांचं स्ट्रक्चर असल्याची माहिती आहे.
सचिनने दोन वेगवेगळ्या जमिनींमध्ये ५० टक्के अविभाजित हिस्सा घेतलाय. यातील पहिला व्यवहार जवळपास ४.५६ कोटी रुपयांचा असून त्यात २,३०२.२७ चौरस मीटर जमिनीतील हिस्सा खरेदी करण्यात आलाय. दुसरा व्यवहार सुमारे १.७५ कोटी रुपयांचा असून त्यात ८०३.९३ चौरस मीटर जमीन घेतलीये.
हे दोन्ही व्यवहार पाहिले तर जवळपास ०.७७ एकर जमिनीतील हिस्स्याचा व्यवहार झालाय. इथे पूर्ण जमीन सचिनच्या नावावर झालेली नसून संबंधित जमिनीतील ५० टक्के अविभाजित हिस्सा खरेदी करण्यात आला आहे.
द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या तिन्ही व्यवहारांचा सरासरी दर जवळपास ४,१६८ रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. शेवटच्या दोन जमिनींमध्ये खरेदी केलेल्या हिस्स्याचा प्रभावी दर सुमारे १,८८८ रुपये प्रति चौरस फूट असल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी सचिनने तब्बल ४.२० कोटी रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी भरलीये.
मुंबई आणि पुण्याच्या जवळ असल्यामुळे लोणावळा हे सेकंड होम आणि हॉलिडे होमसाठी आधीपासूनच लोकप्रिय ठिकाण आहे. सचिनच्या या खरेदीवरून मोठी जमीन घेऊन आपल्या आवडीचं घर बांधण्याचा ट्रेंड वाढतोय, असं दिसून येतंय.