ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फ्राय करंजी हा खास महाराष्ट्रीयन पारंपरिक गोड पदार्थ आहे. सण-उत्सव, दिवाळी किंवा खास प्रसंगी करंजी आवर्जून केली जाते. पण रोजच्या नाश्त्यासाठी सुध्दा फ्राय करंजी केली जाते आणि आवर्जून खाल्ली जाते.
किसलेले खोबरे, पिठीसाखर, खसखस, वेलची पूड, काजू, बदाम, मनुका हे साहित्य सारणासाठी लागते.
मैदा, रवा, गरम तूप, मीठ आणि पाणी इ. साहित्य लागते. या मिश्रणामुळे करंजी कुरकुरीत होते.
कढईत खोबरे थोडेसे परतून घ्या. त्यात खसखस, सुकामेवा घालून हलवत राहा. गॅस बंद करून पिठीसाखर आणि वेलची पूड त्यात मिक्स करा. सारण पूर्णपणे थंड होऊ द्या, म्हणजे करंजी करताना ती फुटत नाही.
मैदा, रवा, मीठ एकत्र करा. त्यात गरम तूप घालून मिक्स करा. मग पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्या. कणिक मळल्यानंतर ते ओलसर कपड्याने १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
मळलेल्या कणिकेच्या लहान गोळे करा. पातळ पोळी लाटून त्यात १ ते २ चमचे सारण भरा. कडा पाण्याने ओलसर करून अर्धचंद्राकृती बंद करा. कातरी किंवा करंजी कातरणीने कडा कापून घ्या.
एक कढई घ्या. त्या कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. करंजी तेलात सोडून मंद ते मध्यम आचेवर तळून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग आल्यावर करंजी बाहेर काढून घ्या. करंजी तयार आहे.
फ्राय करंजी पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. या करंजी १० ते १२ दिवस सहज टिकतात. चहासोबत किंवा सकाळच्या नाश्ताला तुम्ही खाऊ शकता.