Gangappa Pujari
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांचे हाल होत आहेत.
या दमदार पावसामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील तसेच पुणे, शहरासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आजही दिवसभर पावसाची संततधार सुरूच असून, अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.
ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा व महापालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
शहरात पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
प्रशासनाचे आवाहन
पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले असून पुण्यातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.