Shreya Maskar
२१ मे ला 'देऊळ बंद २' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातून स्वामी भक्ती आणि शेतकऱ्यांचे जीवन अधोरेखित केले आहे. चित्रपट पाहून झाल्यावर तुम्हीही अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाण्याचा प्लान करत असाल, तर मुंबई टू अक्कलकोट प्रवास कसा करावा, जाणून घेऊयात.
महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील 'स्वामी समर्थ मंदिर' ज्याला 'वटवृक्ष मंदिर' म्हणूनही ओळखले जाते, हे १९ व्या शतकातील संत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे समाधीस्थळ आहे. या समाधी मंदिराला 'वटवृक्ष मंदिर' किंवा 'श्री स्वामी समर्थ समाधी मठ' म्हणून ओळखले जाते.
अक्कलकोट येथील मुख्य 'श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर' हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. भगवान दत्तात्रेय यांचा अवतार मानल्या जाणाऱ्या या संतांनी ज्या वटवृक्षाखाली उपदेश केला होता, त्या वृक्षाभोवतीच हे मंदिर उभारण्यात आले आहे.
मुंबईहून अक्कलकोटला प्रवास करण्यासाठी तुम्ही निवडलेल्या वाहतुकीच्या साधनानुसार साधारणपणे ८ ते ११ तास लागतात. रस्तेमार्गे हे अंतर अंदाजे ४०० ते ४३० किलोमीटर आहे.
तुम्ही मुंबईहून 'अक्कलकोट रोड' (AKOR) स्थानकापर्यंत जाणारी गाडी पकडू शकता किंवा सोलापूरपर्यंत (SUR) जाऊन तिथून अक्कलकोटसाठी रस्तेमार्गे प्रवास करता येतो.
अनेक खाजगी बस चालक मुंबईहून अक्कलकोटसाठी दररोज AC आणि Non-AC स्लीपर बसेस चालवतात. १० ते १२ तासात तुम्ही पोहचाल आणि बसच्या प्रकारानुसार दर साधारणपणे ₹६०० ते ₹३,००० च्या दरम्यान असतात.
एखाद्या खाजगी किंवा आपल्या सोयीनुसार आखलेल्या प्रवासासाठी मुंबईहून 'मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गा'ने आणि त्यानंतर NH 65 मार्गे (पुणे व सोलापूरमार्गे) प्रवास करणे हा सर्वात सुखकर मार्ग आहे. अंदाजे ९ ते १० तासात अक्कलकोटला पोहचाल.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.