Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्यात डोंगर, दऱ्या आणि किल्ले हिरव्यागार निसर्गाने बहरलेले दिसतात. धबधबे, ढग आणि थंड वातावरणामुळे ट्रेकिंगचा अनुभव अधिक छान वाटतो. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असलेले अनेक जण याच काळात ट्रेकची योजना आखतात.
ट्रेकिंग हा उत्तम व्यायाम असून त्यामुळे शरीराची सहनशक्ती आणि फिटनेस वाढतो. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
हवामानाचा अंदाज तपासूनच ट्रेकचं नियोजन करावं. घसरणार नाहीत असे ट्रेकिंग शूज, रेनकोट, पाणी आणि फर्स्ट एड किट सोबत ठेवावं. अतिवृष्टीचा इशारा असल्यास ट्रेक पुढे ढकलणं हा सुरक्षित पर्याय ठरतो.
कर्नाळा किल्ला मुंबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असून अतिशय सोपा ट्रेक मानला जातो. किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या परिसरात असल्याने ट्रेकदरम्यान विविध पक्ष्यांचं निरीक्षण करता येतं.
इर्शाळगडचा मुख्य ट्रेक मध्यम स्वरूपाचा असला तरी इर्शाळवाडीपर्यंतचा मार्ग सोपा आहे. पावसाळ्यात याठिकाणी मोरबे धरण आणि आजूबाजूच्या सह्याद्री पर्वतरांगा अतिशय सुंदर दिसतात.
पालघरमधील मनोरजवळ असलेला सोनगिरी किल्ला कमी उंचीचा आणि सोप्या चढाईसाठी ओळखला जातो. साधारण ३० ते ४५ मिनिटांत किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येत असल्यामुळे हा नवशिक्या ट्रेकर्ससाठी योग्य पर्याय आहे.
कलावंतीण दुर्गाच्या शिखरापर्यंतचा अंतिम टप्पा कठीण असला तरी प्रभळमाचीपर्यंतचा ट्रेक नवख्या लोकांसाठी सोपा आहे. या मार्गावरून कलावंतीण दुर्ग आणि प्रभळगड यांचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं.