Shreya Maskar
पितृपक्षात आवर्जून खीर पुरीचा बेत करा. तांदळाची खीर बनवण्यासाठी दूध, तांदूळ, साखर, वेलची, बदाम, काजू, मनुका आणि केशर इत्यादी साहित्य लागते.
तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ धुवून २०-३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. पाणी काढून टाका आणि तांदूळ हलकेच मॅश करा. जास्त शिजवू नका, नाहीतर तांदूळ खूप बारीक होईल. एका पातेल्यात दूध उकळवा. उकळी आल्यानंतर गॅसची आच कमी करा. दूध जास्त घट्ट होऊ देऊ नका.
आता उकळलेल्या दुधात तांदूळ घाला आणि मंद आचेवर शिजवा. दूध भांड्याच्या तळाला चिकटू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा. सुमारे २५-३० मिनिटांनी, जेव्हा भात पूर्ण शिजेल आणि दूध घट्ट होईल, तेव्हा साखर घालून ढवळा. नंतर वेलची, चिरलेला सुका मेवा आणि मनुका घालून आणखी ५-७ मिनिटे शिजवा.
तुम्हाला केशर घालायचे असल्यास, ते घालून गॅस बंद करा. खीर थंड झाल्यावर घट्ट होईल. तुम्ही खीर थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवू शकता किंवा प्रसाद म्हणून गरमागरम देऊ शकता.
पुरी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मीठ, तेल/तूप, पाणी इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या, जेणेकरून पीठ चांगले मळले जाईल.
पुरी बनवण्यासाठी प्रथम, गव्हाचे पिठात मीठ आणि १ मोठा चमचा तेल किंवा तूप घालून चांगले मिसळा. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. पुरीचे पीठ पोळीच्या पिठापेक्षा थोडे जास्त घट्ट असावे.
पीठ झाकून १०-१५ मिनिटे मुरू द्या. त्याचे छोटे गोळे लाटून पुऱ्या बनवा. त्या खूप पातळ किंवा खूप जाड लाटू नका. कढईत तेल चांगले गरम करा. पुऱ्या घातल्यावर, त्या फुगण्यासाठी चमच्याने हलकेच दाबा.
दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या आणि काढून घ्या. सर्व पुऱ्या एक एक करून तळा. अशाप्रकारे स्वादिष्ट खीर-पुरी तयार झाली आहे.