Shreya Maskar
पात्रा हा गुजरातमधील नाश्त्याचा पदार्थ आहे. महाराष्ट्रात याला अळू वडी आणि दक्षिण भारतात पाथ्रोड किंवा पॅट्रोडे असेही म्हणतात.
पात्रा बनवण्यासाठी अळूची पाने, बेसन, तांदळाचे पीठ, गूळ पावडर, चिंचेचा गर, हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद पावडर, धणे पावडर, हिंग, गरम मसाला, मीठ, खाण्याचा सोडा, मोहरी, जिरे, पांढरे तीळ, तेल, कोथिंबीर आणि किसलेले खोबरे इत्यादी साहित्य लागते.
पात्रा बनवण्यासाठी सर्वप्रथम अळूची पाने घ्या, ती स्वच्छ धुवा आणि कोरडी करा. लक्षात घ्या चांगल्या ताज्या पानांची निवड करा.
मिश्रण तयार करण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये गूळ पावडर आणि चिंचेचा गर एकत्र करा. गूळ विरघळेपर्यंत सर्वकाही व्यवस्थित मिसळा. नंतर हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, धणे पूड, हिंग, गरम मसाला, मीठ आणि खाण्याचा सोडा घालून मिश्रण चांगले एकजीव करा.
सर्व मसाले गुळाच्या पेस्टमध्ये चांगले मिसळा. नंतर बेसन आणि तांदळाचे पीठ घाला. हळूहळू पाणी घालत राहा आणि घट्ट, गुळगुळीत मिश्रण तयार होईपर्यंत मिसळत राहा.
आता अळूच्या पानांवर बेसनाच्या मिश्रणाचा पातळ थर लावा. नंतर, दुसरे अळूचे पान उलटे ठेवून त्यावर मिश्रणाचा दुसरा पातळ थर लावा. ही प्रक्रिया ४ वेळा पुन्हा करा. प्रत्येक रोलमध्ये ३ ते ४ अळूची पाने असावीत.
अळूच्या पानांचा रोल तयार झाल्यावर तेल लावलेल्या ट्रेवर ठेवा आणि गरम स्टीमरमध्ये २०-२५ मिनिटे वाफवून घ्या. वाफवून झाल्यावर त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या.
नंतर पात्राचे गोल तुकडे करा. फोडणीसाठी एका छोट्या कढईत तेल, मोहरी, जिरे आणि पांढरे तीळ घाला. फोडणी तडतडू द्या.
शेवटी चिरलेला पात्रावर फोडणी टाका आणि पात्राला कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याने सजवा. तुम्ही उकडलेल्या अळू वड्या तळू देखील शकता.