Shreya Maskar
पनीर सूप बनवण्यासाठी पनीरचे पाणी, गाजर, हिरवी ढोबळी मिरची, तेल, ओरेगॅनो पाने, लाल शिमला मिरची आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
पनीर सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये काही थेंब तेल टाकून भाज्या परतून घ्या. गाजर आणि दोन्ही प्रकारच्या शिमला मिरच्या घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. भाज्या जास्त शिजवण्याची गरज नाही.
भाज्या किंचित मऊ झाल्यावर, उरलेले दोन कप पनीरचे पाणी घाला. मध्यम आचेवर हलकी उकळी येऊ द्या. गॅस कमी आचेवर ठेवून द्या.
तयार मिश्रणात ओरेगॅनो, ठेचलेली लाल मिरची आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिसळा. सूप मंद आचेवर २-३ मिनिटे शिजू द्या. भाज्या किंचित मऊ झाल्यावर आणि सूप पूर्णपणे गरम झाल्यावर, गॅस बंद करा.
सूप खूप घट्ट करण्याची गरज नाही. ते हलके आणि थोडे पातळ ठेवा, जेणेकरून भाज्या आणि मसाल्यांची चव चांगली येईल.
तुम्ही सुपामध्ये काळी मिरी किंवा थोडा लिंबाचा रस घाला. वरून कोथिंबीर घातल्याने चव आणखी वाढेल. तुम्हाला आवडत असेल तर वाटाणे किंवा मका देखील घालू शकता.
पनीर बनवल्यानंतर उरलेल्या पाण्यात दुधातील काही पोषक तत्वे टिकून राहतात. त्यात दुधातील नैसर्गिक साखर, लॅक्टोज, थोड्या प्रमाणात प्रथिने, तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात.
तसेच पनीरच्या पाण्यात 'बी' जीवनसत्त्वे देखील असतात. त्यामुळे पनीरचे पाणी फेकून न देता त्यापासून सूप बनवा. तसेच तुम्ही कणिक मळण्यासाठी आणि इतर पदार्थांमध्ये सहजपणे वापर करू शकता.