Shreya Maskar
नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली असून सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्रीत अनेकजण ९ दिवस उपवास करतात. यंदा उपवासात दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा.
दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, जिरे, शेंगदाणा तेल, मीठ, कोथिंबीर, साखर आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून, सोलून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. हिरव्या मिरच्या बारीक चिरून ठेवा.
पॅनमध्ये शेंगदाणा तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा.
फोडणीत उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर चवीनुसार सैंधव मीठ घाला. आता भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
भाजी कोरडी वाटत असल्यास थोडे पाणी शिंपडा. मंद आचेवर २ ते ३ मिनिटे शिजू द्या.आवडीनुसार थोडी साखर आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. गरमागरम दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी तयार आहे.
शेंगदाण्याचे कूट जाडसर वाटल्यास भाजीला छान खमंग पोत येतो. कूट घातल्यानंतर भाजी जास्त वेळ शिजवू नका; अन्यथा ती कोरडी होऊ शकते.
अधिक चवदार भाजीसाठी साजूक तूप वापरा. तसेच तुम्ही दह्यासोबत देखील भाजीचा आस्वाद घेऊ शकता.