Shruti Vilas Kadam
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. देवीला गाईचे तूप नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची धार्मिक परंपरा आहे.
दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. तपश्चर्या, संयम आणि ध्यानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या देवीसाठी हिरवा रंग शुभ मानला जातो. साखर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो.
तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. देवीचे हे रूप धैर्य आणि सामर्थ्याशी संबंधित मानले जाते. या दिवशी राखाडी रंग शुभ असून दूध किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो.
चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. ऊर्जा आणि सृजनशक्तीशी संबंधित या देवीला केशरी रंग समर्पित मानला जातो. या दिवशी देवीला मालपुआ अर्पण करण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते.
पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी पांढरा रंग शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार देवीला केळी अर्पण केली जातात.
सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. सामर्थ्य आणि धैर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या देवीसाठी लाल रंग शुभ मानला जातो. या दिवशी मधाचा नैवेद्य दाखवला जातो.
सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार हे देवीचे उग्र रूप मानले जाते. या दिवशी गडद निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.
अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते. शांती, पवित्रता आणि सौम्यतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या देवीसाठी गुलाबी रंग शुभ मानला जातो. देवीला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे.
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी जांभळा रंग शुभ मानला जातो. देवीला शिरा आणि पुरीचा नैवेद्य अर्पण केला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे.