Surabhi Jayashree Jagdish
कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक असलेला स्निग्ध पदार्थ असून तो पेशी, काही हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी महत्त्वाचा असतो. मात्र त्याचं प्रमाण वाढल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये साचू लागतं आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.
अतिप्रमाणात तळलेले पदार्थ, जास्त तेल-तूप आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. नियमित व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव आणि अपुरी झोप हेही महत्त्वाचे जोखीम घटक आहेत.
फक्त कोलेस्ट्रॉलचा आकडा पाहून औषधं सुरू केली जात नाहीत, तर डॉक्टर LDL , वय, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि हार्ट अटॅक धोका यांचा एकत्रित विचार करतात. LDL कोलेस्ट्रॉल 190 mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास बहुतेक प्रौढांमध्ये औषधोपचाराची गरज असते.
LDL कोलेस्ट्रॉल थोडं वाढलेलं असेल आणि हृदयविकाराचा धोका कमी असेल तर सुरुवातीचे 3 ते 6 महिने जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि पुरेशी झोप यामुळे अनेक रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं.
कोलेस्ट्रॉल कमी करणारी अनेक स्टॅटिन औषधं, विशेषतः सिमव्हास्टॅटिन आणि लोव्हास्टॅटिन, रात्री घेण्याचा सल्ला दिला जातो कारण शरीरात कोलेस्ट्रॉलचं उत्पादन रात्री अधिक होतं. मात्र अॅटोरव्हास्टॅटिन आणि रोझुवास्टॅटिन यांसारखी दीर्घकाळ प्रभावी औषधं सकाळी किंवा रात्री, डॉक्टरांनी सांगितलेल्या निश्चित वेळेला घेता येतात.
रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सामान्य झाल्यानंतर अनेकजण स्वतःहून औषधं बंद करतात. पण ही सवय धोकादायक ठरू शकते. औषधं थांबवल्यानंतर कोलेस्ट्रॉल पुन्हा वाढण्याची आणि हार्ट अटॅकचा धोका वाढण्याची शक्यता असते.
दररोज किमान 30 ते 45 मिनिटं शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्यं आणि चांगल्या चरबीचे स्रोत वाढवून तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करावेत.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.