Surabhi Jayashree Jagdish
CNG कार चालवणाऱ्यांना गॅस भरण्यासाठी वारंवार पंपावर जावं लागतं. या कारमध्ये गॅस साठवण्यासाठी असलेली टाकी मर्यादित क्षमतेची असल्याने एका वेळी ठराविक प्रमाणातच CNG भरता येतो. त्यामुळे अनेकदा प्रवासादरम्यान गॅस संपण्यापूर्वीच पंपावर जाऊन गॅस भरून घ्यावा लागतो.
लहान शहरांमध्ये CNG पंपांची संख्या कमी असल्यामुळे चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही पंपांवर गॅस भरण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागतात. अशा वेळी गॅस भरण्यासाठी बराच वेळ थांबावं लागतं.
तुम्हाला दिवसा कोणत्याही वेळी CNG भरता येतो असं वाटत असेल तर तापमानाचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा तापमान कमी असताना CNG भरणं फायदेशीर ठरू शकते. या वेळेत तापमान तुलनेने कमी असल्यामुळे गॅसची घनता आणि टाकीत भरण्यात येणाऱ्या गॅसचं प्रमाण यावर परिणाम होऊ शकतो.
तापमान कमी असताना CNG ची घनता तुलनेने जास्त असू शकते. त्यामुळे समान दाबाच्या परिस्थितीत टाकीमध्ये गॅस अधिक साठवता येऊ शकतो. तर गॅस भरण्याच्या वेळी मिळणारे प्रमाण आणि त्यातून मिळणारं अंतर यावर परिणाम होऊ शकतो.
सूर्योदयापूर्वी वातावरणातील तापमान कमी असतं. त्यामुळे सकाळी लवकर CNG भरण्यासाठी पंपावर जाणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
दिवसभराच्या उष्णतेनंतर रात्री वातावरणातील तापमान कमी होऊ लागतं. अशा वेळी CNG ची घनता वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे रात्री उशिरा गॅस भरणंही फायदेशीर ठरू शकतं.
CNG कारमध्ये गॅस उच्च दाबाखाली साठवला जातो आणि इंडियन ऑइलच्या माहितीनुसार, गाड्यांमध्ये CNG साठवण्याचा दाब साधारण २०० kg/cm² असतो. गॅस भरण्याच्या वेळी पंपाकडील दाब आणि कारच्या सिलिंडरमधील दाब यांचा गॅस भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.