Bhagyashree Kamble
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधु एकत्र येणार का? असा प्रश्न सामान्यांसह नेत्यांना पडला आहे.
राज ठाकरे यांनी बंधूला घातलेली साद आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबरच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर राज ठाकरेंनी उत्तर देताना, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत, असं राज ठाकरे म्हणालेत.
यावर एका सभेत उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, ' आम्ही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहोत. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहोत', असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
राज ठाकरेंनी घातलेल्या सादेला आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिसादामुळे ठाकरे कुटुंबातील कलहावर पडदा पडणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसे नात्याने चुलत भाऊ. २००६ सालापूर्वी राज ठाकरे शिवसेना पक्षातच होते.
२००६ साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाचा स्वत: चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली.
तेव्हापासून ते आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
मात्र, यासाठी उद्धव ठाकरेंनी एक अट ठेवली आहे. 'महाराष्ट्र हिताच्या आड जर कुणी येत असेल तर, त्याचं स्वागत मी करणार नाही', या अटीवर राज ठाकरे नेमकं काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.