Shreya Maskar
लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'ने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. अभिनेत्री अनंग्शा बिस्वास (Anangsha Biswas) या सीरिजमुळे लोकप्रिय झाली.
'Hindi Rush' शी बोलताना अभिनेत्रीने प्रसिद्धीसोबतच तिला अनेक अडचणींचाही सामना करावा लागला असल्याचा खुलसा केला. अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे, 'मिर्झापूर'मधील तिची भूमिका पाहून लोकांनी तिची एक प्रतिमा तयार केली होती. त्यानंतर तिला अश्लील मागण्यांना सामोरे जावे लागले.
अभिनेत्री अनंग्शा बिस्वास म्हणते की, "पहिल्या सीझनंतर मी खूप अस्वस्थ झाले होते, कारण हे माझ्यासाठी खूप नवीन होते. मला खूप विचित्र ईमेल आणि कमेंट्स येत होत्या. लोक माझा अपमान करत होते. अश्लील कमेंट्समुळे मी हादरून गेले होते. कारण माझ्यासाठी माझे काम म्हणजे सरस्वती आहे. लोक असे का बोलत आहेत हे मला समजत नव्हते."
अभिनेत्री अनंग्शा पुढे म्हणाली, "हळूहळू माझ्या लक्षात आले की प्रत्येकाने तुमच्या कामाची प्रशंसा करणे आवश्यक नाही. काही लोकांना तुमचे काम आवडेल, तर काहींना नाही."
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, "खऱ्या आयुष्यात मी झरिनासारखी अजिबात नाही. पण मालिका पाहिल्यानंतर लोकांना वाटू लागलं की ते मला विकत घेऊ शकतात. मला असे मेसेजेस येत होते, ज्यात विचारलं जायचं, 'एका रात्रीसाठी किती पैसे किंवा काय घेणार? आमच्यासोबत दोन दिवसांसाठी मॉरिशसला या..."
अनंग्शा सांगितल्याप्रमाणे, तिचा मेलबॉक्स अशा मेसेजेसने भरलेला आहे. ती म्हणाली, "मी कदाचित याबद्दल बोलणारही नाही, पण लोकांची मानसिकता बदलणं महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या भूमिका साकारत असतो, पण मी खऱ्या आयुष्यात तशी नाही..."
शेवटी एक खंत व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, "मिर्झापूर पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की मी झरिना आहे. मी फक्त माझी भूमिका साकारत होते. मला वाटतं मी माझी भूमिका चांगली साकारली, म्हणून लोकांना वाटलं की मी तशी आहे. पण जर ते थोडे अधिक संवेदनशील असते, तर कदाचित त्यांनी माझ्या कलेचं कौतुक केलं असतं..."
'मिर्झापूर द मूव्ही' ४ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु भाषेत पाहायला मिळणार आहे. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक पाहायला मिळता आहेत.