Surabhi Jayashree Jagdish
चिया सीड्स भिजवून खाल्ल्याने ते खाण्यास आणि पचवण्यास सोपे होतात. भिजल्यामुळे त्यांच्या बिया फुगतात आणि त्यांच्याभोवती जेलीसारखा थर तयार होतो. चिया सीड्स २४ तास भिजवल्यास त्यातील फॅटी अॅसिड शरीराला उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते.
चिया सीड्स पाण्यात भिजवल्यावर ते फुगतात आणि जेलसारखे दिसू लागतात. ते साधारण ३० मिनिटांपासून काही तासांपर्यंत भिजवून ठेवता येतात. पाण्यात भिजवलेले चिया सीड्स खाल्ल्याने शरीराला फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड मिळतात.
चिया सीड्समध्ये भरपूर फायबर असतं जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. ते खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही. पुरेसं पाणी पिण्यासोबत चिया सीड्स खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
चिया सीड्स दुधात भिजवून खाल्ल्यास आहारात प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांची भर पडते. दुधात चिया सीड्स घालून पुडिंग किंवा स्मूदी तयार करता येतं. हा नाश्त्याचा एक चांगला पर्याय असून त्यातून प्रोटीन, फायबर, स्निग्ध पदार्थ आणि ऊर्जा मिळते.
चिया सीड्समध्ये मॅग्नेशियम असतं. याशिवाय दुधातून प्रोटीन आणि कॅल्शियम मिळतं. चिया सीड्स आणि दूध एकत्र खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहण्यास मदत होते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना हा नाश्ता उपयोगी ठरू शकतो. कारण त्यातील फायबर आणि प्रोटीनमुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
चिया सीड्स दूध आणि पाणी या दोन्हीमध्ये भिजवून खाता येतात. दुधात भिजवल्यास चिया सीड्समधील पोषक घटकांसोबत दुधातील प्रोटीन आणि कॅल्शियमही मिळते. कमी कॅलरी असलेला आणि शरीराला पाणी मिळण्यास मदत करणारा पर्याय हवा असल्यास पाण्यात भिजवलेले चिया सीड्स निवडू शकता.
प्रोटीन, कॅल्शियम आणि ऊर्जा मिळवण्यासाठी चिया सीड्स फुल क्रीम दुधात भिजवून खाता येतात. मात्र फुल क्रीम दुधात फॅट आणि कॅलरीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे गरजेनुसार दुधाची निवड करावी.