Fake Milk: डिटर्जेंट आहे की दूध; दुधाची शुद्धता कसं ओळखाल?

Bharat Jadhav

दुधात डिटर्जंटसारख्या पदार्थांची भेसळ

जवळपास प्रत्येक घरात दुधाचा वापर केला जातो. म्हणूनच आपण सेवन करत असलेल्या दुधाच्या शुद्धतेबद्दल लोकांच्या मनात नेहमीच चिंता असते. दुधात पाणी, स्टार्च आणि अगदी डिटर्जंटसारख्या पदार्थांची भेसळ केल्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. अशा परिस्थितीत घरीच दुधाची शुद्धता कशी तपासावी, हे जाणून घ्या.

प्रयोगशाळेची गरज नाही

भेसळयुक्त दूध पहिल्या नजरेत ओळखणे नेहमीच सोपे नसते; त्याचा रंग आणि स्वरूप अगदी अस्सल दुधासारखेच असू शकते. मात्र दुधातील पाणी, स्टार्च किंवा डिटर्जंट यांसारख्या भेसळीच्या घटकांना तुम्ही घरच्या घरी, साध्या पद्धती वापरून शोधू शकता. यासाठी जटिल यंत्रणेची किंवा प्रयोगशाळेची गरज पडणार नाही.

दुधात पाणी मिसळल्याचं कसं ओळखाल?

दुधात पाणी मिसळल्याचं जाणून घेण्यासाठी एक स्वच्छ आणि गुळगुळीत ताट घ्या. ताट थोडे तिरके करा आणि त्यावर दुधाचे काही थेंब टाका. जर दूध हळूहळू खाली वाहताना मागे एक जाड पांढरा थर किंवा खूण सोडत असेल तर दुधात फॅट्स आणि प्रोटिन्स आहेत. जर दूध अतिशय वेगाने खाली वाहून गेले आणि मागे कोणतीही खूण राहिली नाही, तर दुधात पाणी मिसळल्याचं समजा.

दुधात स्टार्चची भेसळ असल्याचं कसं ओळखावं

कधीकधी दुधात पाणी मिसळल्यानंतर, त्याचा घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी त्यात स्टार्च घातले जातात. हे स्टार्च सहसा तांदूळ किंवा बटाट्यासारख्या स्रोतांपासून मिळवले जातात. दुधात स्टार्चची उपस्थिती तपासण्यासाठी, एका लहान वाटीत थोडे दूध घ्या आणि ते थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात आयोडीन टिंक्चरचे दोन ते तीन थेंब टाका. जर दुधाचा रंग निळसर होऊ लागला, तर याचा अर्थ त्यात स्टार्च असू शकतो.

दुधात डिटर्जंटची भेसळ कशी ओळखावी?

डिटर्जंटमुळे दुधात जास्त फेस निर्माण होऊ शकतो. यामुळे दूध अधिक घट्ट किंवा ताजे असल्याचे वाटते. हे तपासण्यासाठी एका बाटलीत सुमारे ५ ते १० मिलिलीटर दूध घ्या. त्यात साधारण तितकेच पाणी घाला आणि बाटली नीट हलवा. सामान्य दुधामध्ये थोडा हलका फेस येऊ शकतो, परंतु तो लवकर नाहीसा होतो. जर खूप जास्त फेस तयार झाला आणि तो बराच वेळ टिकला तर भेसळ असल्याचं समजा.

केवळ या चाचण्यांवर अवलंबून राहू नका

जरी घरी करता येण्याजोग्या या पद्धती दुधातील सामान्य भेसळीची प्राथमिक तपासणी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तरी त्यांना प्रयोगशाळेतील चाचण्यांचा पर्याय मानू नये. जर दुधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका असतील, तर खात्री करण्यासाठी वैज्ञानिक चाचणी करणे आवश्यक असते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

जेवण कमी केलं, दररोज एक्सरसाइजही सुरूय, पण वजन कमी होईना? काय चुकतंय?