Shruti Vilas Kadam
डोकेदुखी हे विविध कारणांमुळे होते. तणाव, थकवा किंवा इतर कारणांमुळे डोके दुखू शकते. याउलट, मायग्रेन हा मज्जासंस्थेशी संबंधित त्रास आहे. त्यामध्ये डोकेदुखीचे झटके येऊ शकतात.
डोकेदुखीमध्ये डोक्याच्या दोन्ही बाजूंना किंवा कपाळाभोवती दुखू शकते. मायग्रेनमध्ये अनेकदा डोक्याच्या एका बाजूला ठणकणारी तीव्र वेदना होते.
डोकेदुखीमध्ये डोक्यावर पट्टा घट्ट बांधल्यासारखे किंवा दाब आल्यासारखे वाटते. मायग्रेनमध्ये वेदना ठणकणाऱ्या स्वरूपाच्या असतात. चालणे, जिने चढणे किंवा इतर हालचालींमुळे ही वेदना वाढते.
मायग्रेनमध्ये डोकेदुखीसोबत मळमळ किंवा उलट्या होण्याची शक्यता असते. साध्या डोकेदुखीमध्ये ही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे डोकेदुखीसोबत मळमळ होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींना लाईट, मोठा आवाज किंवा काही ठराविक वास सहन होत नाहीत. अशा वेळी शांत आणि अंधाऱ्या खोलीत विश्रांती घेतल्याने आराम मिळतो.
साधी डोकेदुखी काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकू शकते. मायग्रेनचा झटका उपचार न केल्यास साधारण ४ ते ७२ तास राहू शकते.
अचानक अतिशय तीव्र डोकेदुखी, तापासोबत मान आखडणे, बोलताना अडचण येणे, शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा अचानक दृष्टी कमी होणे अशी लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.