Shreya Maskar
नेहमी सकाळी नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा, इडली, वडे खाऊन कंटाळा आला असेल तर साधी पण पौष्टिक मसाला चपाती झटपट बनवा.
मसाला चपाती बनवण्यासाठी चणा डाळ, कढीपत्ता, पुदिन्याची पाने, लसूण , जिरे , लाल मिरची पावडर, मीठ, गव्हाचे पीठ, तेल, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
मसाला चपाती बनवण्यासाठी मिक्सरमध्ये चणा डाळ, कढीपत्ता, पुदिन्याची पाने, लसूण, जिरे, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकून बारीक पावडर बनवा. अशाप्रकारे चपातीला लावण्यासाठी मसाला तयार झाला.
आता तुपात छान मऊ कणिक मळून घ्या. कणकेचे छोटे गोळे करून गोल चपाती लाटून घ्या. चपातीचा आकार थोडा मोठा करा.
चपातीवर चमचाभर तेल व्यवस्थित पसरवून घ्या. त्यावर तयार चटपटीत मसाला भुरभुरवा. मसाला पोळीला लागला की त्यावर बारीक कोथिंबीर घाला.
आता चपाती दुमडून पुन्हा लाटून घ्यावी. त्यानंतर चपातीवर वरून चांगले तूप लावून घ्या. दुसरीकडे पॅन गरम करा आणि त्यात तूप टाका. तुम्ही चपाती तेलातही भाजू शकता.
गरमागरम मसाला चपाती गरमागरम चहासोबत खा. ही रेसिपी अवघ्या ४-५ मिनिटांत तयार होते.
तुमच्याकडे रात्रीच्या उरलेल्या चपात्या असतील तर तुम्ही सकाळी त्या तेलात भाजून तयार मसाला त्यावर लावा आणि पुन्हा हलके भाजून घ्या. घाईगडबडीत नाश्त्यासाठी हा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ आहे.