Shreya Maskar
पावसाळ्यात बाहेरचा टपरीवरचा चहा पिण्यापेक्षा घरीच फक्त १० मिनिटांत मसाला चहा बनवा. मसाला चहा बनवण्यासाठी 'मसाला' परफेक्ट असणे गरजेचे आहे, त्यामुळे मसाला चहा आणि चहाच्या मसाल्याची रेसिपी जाणून घेऊयात.
चहा मसाला बनवण्यासाठी हिरव्या वेलची, लवंगा, काळी मिरी, दालचिनी, जायफळ, बडीशेप, सुंठ पूड, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या इत्यादी साहित्य लागते.
चहा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम वेलची, लवंगा, काळी मिरी, दालचिनी, जायफळ आणि बडीशेप मंद आचेवर हलके भाजून घ्या. मसाल्यांचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्या. फक्त त्यातील ओलावा काढून टाका.
आता गॅस बंद करून गरम मसाल्यांमध्ये वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घाला. यामुळे गुलाबाच्या पाकळ्या किंचित सुकतील, ज्यामुळे त्या दळायला सोप्या जातील. भाजलेले मसाले थोडे थंड झाल्यावर ते जाडसर दळा. शेवटी थोडे आल्याची पूड घालून मिक्स करा. अशाप्रकारे सुगंधी चहा मसाला तयार आहे.
टपरीसारखा मसाला चहा बनवण्यासाठी पाणी, दूध, चहापत्ती, चहा मसाला, साखर इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.
मसाला चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून एक उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चहापत्ती आणि साखर घालून काही मिनिटे शिजू द्या.
नंतर दूध घाला आणि गॅसची आच वाढवा. त्यानंतर तयार चहा मसाला चवीनुसार मिक्स करा. चहाचा स्वाद आणि रंग खुलून येण्यासाठी चहा थोडा उकळा.
चहा जास्त उकळल्याने मसाल्यांचा सुगंध कमी होऊ शकतो आणि चव कडू लागू शकते. चहा तयार झाल्यावर तो गाळून कपात काढा. गरमागरम चहाचा पावसाळ्यात कुरकुरीत भजींसोबत आस्वाद घ्या.