Shreya Maskar
वैवाहिक आयुष्यात प्रेम, विश्वास आणि एकमेकांना समजून घेणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. अनेकदा नवरे आपल्या भावना किंवा अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत; मात्र त्यांनाही पत्नीकडून प्रेम, आपुलकी आणि भावनिक आधाराची अपेक्षा असते.
लग्नानंतर घर, नोकरी, मुलं आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये पती-पत्नी एकमेकांना वेळ देणं विसरतात. अशा वेळी प्रेमाने बोलणं, कौतुक करणं, एखादी छोटीशी मिठी मारणं किंवा दिवस कसा गेला हे विचारणं यामुळे नात्यातील जवळीक वाढू शकते.
पतीलाही त्याच्या मेहनतीचं, जबाबदारीचं आणि योगदानाचं कौतुक व्हावं, अशी अपेक्षा असू शकते. त्याने केलेल्या छोट्या-मोठ्या कामांसाठी आभार मानणं आणि इतरांसमोर त्याचा अपमान टाळणं यामुळे नात्यात परस्पर आदर वाढतो.
नात्यात संवादाला विशेष महत्त्व असतं. अनेक पुरुषांना आपली चिंता, कामाचा ताण किंवा मनातील भावना व्यक्त करणं कठीण जाऊ शकतं. अशा वेळी पत्नीने शांतपणे ऐकून घेणं, लगेच टीका न करणं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचे असते.
आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी अपयश, आर्थिक चिंता, कामाचा ताण किंवा कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी जोडीदाराने साथ द्यावी, असा स्वाभाविक विचार असतो. पतीला अडचणीच्या काळात पत्नीने त्याच्यावर विश्वास दाखवावा, एवढीच अपेक्षा असते.
संसारात जबाबदाऱ्या वाढल्या तरी एकमेकांसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. एकत्र जेवण करणं, फिरायला जाणं, आवडीचे चित्रपट पाहणं किंवा निवांत गप्पा मारणं यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहतो. पती-पत्नीने एकमेकांचे चांगले मित्र बनणे महत्त्वाचे असते.
पती-पत्नीच्या अपेक्षा प्रत्येक नात्यात वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे केवळ अंदाज बांधण्यापेक्षा एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधणं अधिक महत्त्वाचं आहे. प्रेम, आदर, विश्वास नात्याला मजबूत करते.
सुखी संसारासाठी केवळ पत्नीनेच नव्हे, तर पतीनेही जोडीदाराच्या भावना आणि अपेक्षा समजून घेणं आवश्यक आहे, ज्यामुळे नातं सुंदर बनते.