Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची गोष्ट आजही लोकांना खूप आकर्षित करते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघनखांनी मारलं ही घटना इतिहासात मोठ्या धाडसाची म्हणून ओळखली जाते. येत्या १ तारखेला अभिनेता रितेश देशमुख याचा राजा शिवाजी हा चित्रपट येतोय, त्यामुळे पुन्हा एकदा या गोष्टींवर चर्चा रंगणार आहे.
विजापूरमध्ये अफजल खानाच्या पत्नींच्या कबरी आजही लोकांच्या कुतूहलाचा विषय आहेत. असं सांगितलं जातं की, अफजल खानाने आपल्या ६३ पत्नींचा जीव घेतला होता. मात्र यामध्ये किती सत्य आहे, यावर इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
कर्नाटकातील विजापूरमध्ये एका चबुतऱ्यात सात रांगा दिसतात. पहिल्या चार रांगांमध्ये अकरा, पाचव्या रांगेत पाच आणि शेवटच्या दोन रांगांमध्ये सात अशा मिळून ६३ कबरी आहेत.
१६६८ पर्यंत विजापूर ही आदिलशाहीची राजधानी होती. अफजल खान हा आदिलशाहीचा सेनापती असून दक्षिणेत साम्राज्य वाढवण्यात त्याने मोठी भूमिका बजावली होती.
भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी हेन्री कझिन्स यांनी लिहिलंय की, शिवाजी महाराजांना भेटायला जाण्याआधी ज्योतिष्यांनी अफजल खानाला सांगितलं होतं की तो जिवंत परतणार नाही.
हेन्री कझिन्स यांनी १९०५ मध्ये प्रकाशित झालेल्या Bijapur: The Old Capital of the Adilshahi Kings या पुस्तकात लिहिलंय की, अफजल खान भविष्यवाणींवर खूप विश्वास ठेवत असे. त्याने आपल्या महालाजवळच स्वतःची कबर आणि एक मशीद बांधून घेतली होती.
ज्योतिष्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीचा अफजल खानावर इतका परिणाम झाला की मोहिमेला निघताना त्याने कबरीवर मृत्यूचा दिवस लिहून ठेवला होता. त्यामुळे तो आणि त्याचे सहकारी विजापूरहून निघताना जिवंत परत येणार नाहीत, या विचारानेच बाहेर पडले.
हेन्री कझिन्स यांच्या मते, अफजल खानाने आपल्या पत्नींना बुडवून मारण्याचा निर्णय घेतला होता. त्या ठिकाणी ६३ कबरींबरोबरच एक रिकामी कबरही आहे.
इतिहासकार लक्ष्मी शरत यांनी द हिंदू मध्ये लिहिलंय की, युद्धात मृत्यू झाल्यानंतर आपल्या पत्नी इतरांच्या हाती लागू नयेत म्हणून अफजल खानाने त्यांना विहिरीत ढकलून ठार केलं. एका पत्नीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही पकडून मारण्यात आलं.