Manasvi Choudhary
नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. मकरसंक्रांतीला सुगड पूजा केली जाते.
'सुगड' म्हणजे 'सुघट' (चांगला घड) मातीच्या या भांड्यात शेतात नवीन आलेल्या पिकांचे अंश भरून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
सुगड पूजेसाठी सुगड, हरभरा, ओले शेंगदाणे, गाजर, ऊसाची कांडके, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ आणि तिळगूळ, हळद-कुंकू, पांढरा दोरा (कापूस), फुले, अक्षता, विड्याची पाने, सुपारी पाट किंवा चौरंग, रांगोळी, दिवा, अगरबत्ती आणि नैवेद्यासाठी गुळाची पोळी किंवा तीळ-गूळ हे साहित्य एकत्र करा.
पाटाभोवती सुंदर रांगोळी काढा. पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर थोडे तांदूळ किंवा गहू ठेवा.
सुगडांना ओल्या हळदी-कुंकवाच्या उभ्या पाच रेषा काढा आणि त्यांच्या गळ्याला पांढरा दोरा गुंडाळा.
सुगडामध्ये ऊस, बोरे, गाजर, हरभरा, शेंगदाणे आणि गव्हाच्या ओंब्या भरा. त्यावर थोडे तीळ आणि तिळगूळ टाका
तयार केलेली सुगड पाटावरील धान्यावर मांडा. साधारणपणे मोठी सुगड खाली आणि त्यावर छोटी सुगड ठेवली जातात. सुगडावर हळद-कुंकू, अक्षता आणि फुले वाहून मनोभावे पूजा करा.
तिळाचे लाडू, हलवा किंवा गुळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवा.