Saam Tv
महाराष्ट्रातील हे १० पारंपरिक पदार्थांमध्ये केवळ खाण्याची चवच नाही, तर त्यामागे तेथील मातीचा सुगंध आणि समृद्ध परंपरा दडलेली आहे.
महाराष्ट्राचे ‘फास्ट फूड’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला वडापाव. गरमागरम बटाटा वडा, त्यावर तिखट-सुक्की चटणी आणि तळलेली हिरवी मिरची असा हा साधा पण अप्रतिम पदार्थ प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा आणि चवीला उत्तम आहे.
नाशिकची मिसळ ही तिच्या वेगळ्या फरसाण आणि तरीसाठी प्रसिद्ध आहे. मोड आलेल्या मटकीची उसळ, त्यावर शेव-फरसाण, सोबत बारीक चिरलेला कांदा आणि पाव असा हा कायम पसंतीस उतरतो.
सण-उत्सवांमध्ये आवर्जून केली जाणारी पुरणपोळी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. चनाडाळ आणि गुळाचे गोड ‘पुरण’ घालून कणकेत लाटलेली ही पोळी साजूक तूप किंवा दुधासोबत खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या कोकणात सी-फुडची रेलचेल असते. कुरकुरीत मसाल्यात तळलेली 'सुरमई फ्राय' आणि जेवणानंतर पोटाला थंडावा देणारी गुलाबी रंगाची 'सोलकढी' हे कोकणवासीयांचे आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
चितळे बंधूंची खमंग आणि कुरकुरीत भाकरवडी ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशा-परदेशात प्रसिद्ध आहे. गोड-तिखट चवीचा हा संगम चहाच्या वेळी खाण्यासाठी उत्तम मानला जातो.
विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूरची ओळख तिथल्या तर्री पोह्यां शिवाय अपूर्ण आहे. साध्या पोह्यांवर तर्री, शेव, कोथिंबीर आणि लिंबू पिळून खाण्याचा हा अनुभव अतिशय भन्नाट असतो.
खाद्यप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा रस्सा. सुगंधी मसाले आणि कांदा-खोबऱ्याच्या तिखट ‘तांबड्या रस्या’ सोबत खोबरं आणि मटणाच्या अर्कानं बनलेला ‘पांढरा रस्सा’ खाल्ल्यानंतर अस्सल कोल्हापुरी चवीची प्रचिती येते.
खानदेश भागात वांग्याचे खमंग भारित आणि गरम बाजरीची भाकरी हा अत्यंत लोकप्रिय मेनू आहे. चुलीवर भाजलेल्या वांग्याचा स्मोकी फ्लेवर आणि त्यावर साजूक तूप, यामुळे या जेवणाची लज्जत कैक पटीने वाढते.
गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे असलेले पिठलं-भाकरी’ हे मराठवाड्याचे मुख्य अन्न मानले जाते. बेसन, कांदा आणि हिरवी मिरची घालून केलेले झणझणीत पिठलं आणि सोबत ज्वारीची गरम भाकरी हा मराठमोळ्या जेवणाचा आत्मा आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याचा कंदी पेढा हा त्याच्या विशिष्ट चवीसाठी आणि रंगासाठी ओळखला जातो. खव्याला आटवून आणि त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून बनवलेला हा पेढा तोंडात विरघळणारा असतो.
NEXT : मेंदू, डोळे ते शरीरातील हाडं...; रोज २ उकडलेली अंडी खाल्ली तर कोणते बदल होतात?