Shreya Maskar
विदर्भ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात घनदाट जंगलं, वन्यजीव, ऐतिहासिक मंदिरं आणि निसर्गरम्य डोंगररांगा. हिवाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत फिरण्यासाठी विदर्भात अनेक सुंदर पर्यटनस्थळं आहेत.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे विदर्भातील एकमेव प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. थंडगार वातावरण, खोल दऱ्या, हिरवीगार जंगलं आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्स यामुळे हिवाळ्यात येथे फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पंचबोल पॉइंट, गाविलगड किल्ला आणि भीमकुंड ही येथील प्रमुख आकर्षणं आहेत.
नागपूरपासून जवळ असलेले रामटेक हे धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. जवळच असलेल्या खिंडसी तलावामुळे सहलीत नौकाविहार आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंदही घेता येतो.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वन्यजीवप्रेमींसाठी खास पर्यटनस्थळ आहे. घनदाट जंगल, तलाव, विविध पक्षी आणि वाघांचे दर्शन यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते. हिवाळ्यात आल्हाददायक हवामानात जीप सफारीचा अनुभव घेता येतो.
नागपूर जिल्ह्यात रामटेकजवळ पेंच नदीवर तोतलाडोह धरण आहे. धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर निसर्गप्रेमींना आकर्षित करतो. हिवाळ्यात परिसरातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी येथे भेट देता येते.
नागपूरपासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर खापा परिसरात खेकडानाला हे सुंदर धरण आणि जलाशय आहे. डोंगररांगा, जंगल आणि पाण्याने वेढलेला परिसर यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आकर्षक आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले नैसर्गिक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. सरोवराचा अनोखा आकार, आजूबाजूची हिरवळ आणि ऐतिहासिक मंदिरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
NEXT : कामाच्या धावपळीतून ब्रेक घ्या! बदलापूरमधील 'या' ६ ठिकाणी विकेंडला फिरायला जा