ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक लाडू. मग या माघी गणेशोत्सवासाठी खास गोड मोदकांचा नैवेद्य करा. मोदक करण्यासाठी चोय बनवणे महत्त्वाचे आहे. मग या टाईमला थोड्या वेगळ्या पध्दतीचे सारण बनवून बघा. मावा पेढे वापरून बनवलेले हे सारण खूपच चविष्ट आणि झटपट होते. जाणून घ्या रेसिपी
किसलेले ओले खोबरे, मावा, साखर, कंदि पेढे, तूप, वेलची पूड, केशर आणि ड्रायफ्रुट इ. साहित्य लागते.
एक मोठी कढई घ्या. त्या कढईत थोडे तूप गरम करून घ्या आणि तूपात मावा आणि किसलेले खोबरे टाका. मंद आचेवर माव्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मावा चांगला परतून घ्या. दोन्ही गोष्टी चांगल्या परतून मऊ करुन घ्या.
मावा थोडा मऊ झाल्यावर त्यात कुस्करलेले कंदि पेढे टाका. यामुळे सारणाला छान गोडवा आणि खास चव येते.
पेढे टाकून झाल्यानंतर चवीनुसार साखर टाका. चोय जास्तपण गोड नसावी. नंतर वेलची पूड आणि केशर घाला. हे सगळे मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवत राहा.
बारीक चिरलेले काजू-बदाम मिश्रणात घालून मिश्रण नीट हलवून घ्या. यामुळे मोदकांचे सारण अधिक पौष्टिक बनते.
तयार झालेले मिश्रण गॅसवरून उतरवून थोडं थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर मोदक बनवायला सुरुवात करा.
मोदकाच्या साच्यात सारण भरून छान आकार द्या आणि छोट्या आकाराचे मोदक तयार करा.
तयार झालेले मावा पेढे टाकून केलेले मोदक गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी समोर ठेवा.