Surabhi Jayashree Jagdish
पूर्वी फुफ्फुसाचा कॅन्सर हा मुख्यतः वृद्ध आणि जास्त धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींशी जोडला जात होता. मात्र अलीकडील काळात ४० वर्षांखालील तरुणांमध्येही हा आजार वाढत असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलंय.
तरुण वयात कॅन्सरची शक्यता कमी असते, असा समज असल्यामुळे सुरुवातीची लक्षणं अनेकदा दुर्लक्षित केली जातात. सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना किंवा वारंवार छातीचा संसर्ग याकडे अनेकदा अॅलर्जी, दमा किंवा व्हायरल संसर्ग म्हणून पाहिलं जातं.
तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला कायम राहणं हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. खोकताना रक्त येणं, अचानक वजन कमी होणं, सतत थकवा जाणवणं किंवा छातीत जडपणा आणि अस्वस्थता जाणवणं याकडे दुर्लक्ष करू नये.
धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं सर्वात मोठं कारण असलं तरी ते एकमेव कारण नाही. इतरांच्या सिगारेटच्या धुराचा सतत संपर्क (सेकंड-हँड स्मोक), वाढतं वायुप्रदूषण आणि कामाच्या ठिकाणी केमिकल्स किंवा धुळीचा संपर्क यामुळेही धोका वाढू शकतो.
काही तरुण रुग्णांमध्ये विशिष्ट आनुवंशिक बदल (Genetic Mutations) आढळून येतात. ज्यामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असल्यास डॉक्टर अतिरिक्त तपासण्यांचा सल्ला देऊ शकतात.
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि चांगली जीवनशैली आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी त्यामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका पूर्णपणे नाहीसा होत नाही. दीर्घकाळ श्वासाशी किंवा छातीशी संबंधित त्रास होत असल्यास केवळ आपण तरुण आणि फिट आहोत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे लंग कॅन्सरच्या निदान आणि उपचारांमध्ये मोठी सुधारणा झालीये. इम्युनोथेरपी, मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, लो-डोस सीटी इमेजिंग आणि टार्गेटेड थेरपीमुळे अनेक रुग्णांना अधिक प्रभावी उपचार मिळत आहेत.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.