Surabhi Jayashree Jagdish
फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरच्या ऊतींमध्ये अतिरिक्त चरबी जमा होते. मद्यपानामुळे होणाऱ्या फॅटी लिव्हरसोबतच इतर कारणांमुळे होणारा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरही आढळतो. सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं जाणवत नाहीत.
भेंडीचं पाणी तयार करण्यासाठी साधारणपणे भेंडी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवली जाते आणि सकाळी ते पाणी प्यायलं जातं. भेंडीमध्ये विरघळणारे तंतू, अँटिऑक्सिडंट्स आणि म्युसिलेज म्हणजेच चिकट जेलसारखा घटक असतो.
भेंडीतील फायबर ग्लुकोजचं शोषण हळू करण्यास मदत करू शकतात. इन्सुलिन संवेदनशीलता चांगली राहिल्यास लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. भेंडीतील अँटिऑक्सिडंट घटक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि त्याच्याशी संबंधित दाह कमी करण्याच्या प्रक्रियेला हातभार लावू शकतात.
मेथीचं पाणी तयार करण्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायलं जातं. मेथीमध्ये विरघळणारे फायबर, सॅपोनिन्स आणि गॅलॅक्टोमॅनन यांसारखे घटक आढळतात. पचन सुधारण्यासोबतच रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलच्या नियंत्रणासाठीही मेथीचा आहारात वापर केला जातो.
मेथीमधील फायबर लिपिड मेटाबॉलिझमला म्हणजेच शरीरातील चरबीच्या प्रक्रियेला मदत करतात. यामुळे ट्रायग्लिसराइड्स कमी ठेवण्यास आणि लिव्हरच्या आरोग्याला मदत होऊ शकते. मेथीमुळे भूक नियंत्रित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते.
भेंडीचं पाणी पोटासाठी तुलनेने सौम्य मानलं जातं आणि त्यातील फायबर ग्लुकोजच्या नियंत्रणाला मदत करू शकतं. मेथीच्या दाण्यांमधील घटक चयापचय, भूक आणि लिपिड मेटाबॉलिझमवर परिणाम करू शकतात. त्यामुळे एखादा पर्याय निवडताना व्यक्तीची रक्तातील साखर, वजन, कोलेस्ट्रॉल आणि एकूण मेटाबॉलिक स्थिती लक्षात घेणं आवश्यक आहे.
फॅटी लिव्हरमध्ये भेंडीचं पाणी आणि मेथीचं पाणी दोन्ही आहाराचा एक भाग म्हणून वापरता येऊ शकतात, परंतु त्यासोबत वजन नियंत्रण, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचं आहे. रिफाइंड कार्बोहायड्रेट्स कमी करणं आणि मद्यपान टाळणंही लिव्हरच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.