Shreya Maskar
अनेक वेळा रात्रीच्या चपात्या उरतात. तेव्हा या उरलेल्या चपात्यांपासून चटपटीत चिवडा बनवा. तुमचा नाश्ता फक्त 10 मिनिटांत तयार होईल. रेसिपी लिहून घ्या.
उरलेल्या चपातीचा चिवडा बनवण्यासाठी उरलेल्या चपात्या, तेल, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, कांदा, मीठ, हळद आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
उरलेल्या चपात्यांचा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम उरलेल्या चपातीचे तुकडे करून मिक्सरमध्ये चुरा तयार करा. चुरा जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून चांगले परतून घ्या. फोडणी चांगली तडतडून द्या. जेणेकरून चिवड्याला चांगला स्वाद येईल.
त्यानंतर त्यात शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, हळद घालून मिक्स करा. तुम्ही यात तुमच्या आवडत्या भाज्या देखील बारीक चिरून टाकू शकता.
त्यानंतर या मिश्रणात चपातीचा चुरा टाकून सर्व एकत्र करा. ५-१० मिनिटे चिवडा मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. वरून तुम्ही थोडे तेल देखील टाकू शकता.
यात तुम्ही भाजलेले काजू देखील टाकू शकता. शेवटी वरून हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा. अशाप्रकारे चपातीचा चिवडा खाण्यासाठी तयार झाला आहे.
गरमागरम चहासोबत उरलेल्या चपातीचा चिवड्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला आवडत असेल तर चिवड्यावर बारीक शेव टाका आणि लिंबू पिळा.