Surabhi Jayashree Jagdish
रात्रीची वेळ म्हणजे शरीर आणि मनाला विश्रांती देण्याची वेळ असते. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आपण बिछान्यावर पडतो आणि शांत झोपण्याचा प्रयत्न करतो. पण हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर व्यक्तींसाठी झोप ही केवळ आरामाची बाब नसते, कारण रात्री शरीरात होणारे काही बदल हृदयाच्या आरोग्याचे संकेत देऊ शकतात.
हृदयाच्या समस्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी झोपण्याची एकच पद्धत योग्य असतं असं नाही. संबंधित व्यक्तीला कोणत्या प्रकारची हृदयाची समस्या आहे तिला कोणती लक्षणं जाणवतात आणि तिची एकूण प्रकृती कशी आहे, यावर झोपण्याची योग्य स्थिती ठरते.
हृदय शरीराच्या डाव्या बाजूला असल्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्यास हृदयावर दबाव येतो किंवा त्याचे नुकसान होतं असा अनेकांचा समज असतो. पण हा समज सर्वसाधारणपणे योग्य नाही. हृदय छातीच्या पिंजऱ्यात सुरक्षित असते आणि डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयाला कोणतीही इजा होत नाही.
काही व्यक्तींना डाव्या कुशीवर झोपताना स्वतःच्या हृदयाची धडधड अधिक जाणवू शकते. अशा वेळी त्यांना अस्वस्थ वाटू शकते किंवा झोप घेणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे उजव्या कुशीवर वळणं किंवा शरीराचा वरचा भाग किंचित उंच ठेवून झोपणं अधिक आरामदायी ठरू शकतं.
स्थिर स्थितीतील हार्ट अटॅक असलेल्या व्यक्तींनी अशी झोपण्याची स्थिती निवडावी ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणार नाही. तसंच आधीपासून असलेली लक्षणं झोपण्याच्या स्थितीमुळे वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी.
हार्ट अटॅक येऊन गेलेल्या काही रुग्णांना पूर्णपणे पाठीवर झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा वेळी डोक्याखाली किंवा शरीराच्या वरच्या भागाखाली उशा ठेवल्याने काही प्रमाणात आराम मिळू शकतो. अचानक नेहमीपेक्षा जास्त उशा घेऊन झोपण्याची गरज भासू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
प्रत्यक्षात तुम्ही कोणत्या कुशीवर झोपता यापेक्षा त्या स्थितीत शरीराला नेमकं काय जाणवतं हे अधिक महत्त्वाचे असते. एखाद्या स्थितीत झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत अस्वस्थता किंवा वेदना जाणवणं, चक्कर येणं अथवा हृदयाची असामान्य धडधड होणं अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.