Sakshi Sunil Jadhav
टिटवीची अंडी खाल्ल्याने माणसाला कधीच झोप लागत नाही, असं गावाकडे आपण ऐकलच असेल.
“आर्मीत सैनिकांना टिटवीची अंडी खायला देतात म्हणजे त्यांना झोप येत नाही” अशा अफवा अजुनही लोकांमध्ये सुरु आहेत.
टिटवी ओरडणं म्हणजे काहीतरी संकट येणार, घरावरून टिटवी ओरडत गेली की, अपशकून होतो असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात टिटवीचा आवाज हा अपशकून नसून संरक्षणासाठी दिलेला इशारा असतो.
टिटवीजवळ पारस मणी असतो आणि लोखंड ठेवलं तर सोनं होतं, ही गोष्टही पूर्णपणे काल्पनिक आहे. आजपर्यंत असा एकही शास्त्रीय पुरावा आढळलेला नाही.
टिटवी जमिनीवर खड्डा करून अंडी घालते. अंड्यांना धोका जाणवला तर ती जिवाच्या आकांताने ओरडते आणि शत्रूला दूर नेण्यासाठी जखमी असल्याचं नाटक करते.
एक टिटवी घरट्याजवळ ओरडत राहते, तर दुसरी टिटवी पंख मोडल्यासारखी फडफड करत शत्रूला घरट्यापासून दूर घेऊन जाते. ही तिची संरक्षण कला आहे.
अंड्यातून बाहेर पडलेली पिल्लं फक्त दोन दिवसांत धावू लागतात. आई-वडिलांच्या आवाजातील संकेत मिळताच ती जमिनीशी एकरूप होतात, त्यामुळे शत्रूला ती दिसत नाहीत.
नदीकाठ, ओसाड माळरान, मैदानं आणि निर्जन डोंगरांवर टिटवी आढळते. मार्च ते ऑगस्ट हा तिचा विणीचा काळ असतो. ती झाडावर घरटं बांधू शकत नाही.
टिटवीचा आवाज कर्कश नसून तो काळजी करणाऱ्या पालकांचा आवाज आहे. पिल्लांना उष्णता लागू नये म्हणून ती छाती ओली करून त्यांच्या डोक्यावर ठेवते.