Shruti Vilas Kadam
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीची नंदादेवी रूपात पूजा करण्यात आली. पारंपरिक धार्मिक विधी आणि भक्तिभावाने देवीचे पूजन करण्यात आले.
देवीमाहात्म्यातील मूर्तिरहस्यामध्ये नंदादेवीच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. देवीची सोन्यासारखी कांती आणि तेजस्वी रूप भक्तांचे लक्ष वेधून घेते.
नंदादेवीला सुवर्णमय वस्त्रे आणि आकर्षक अलंकारांनी सजवण्यात आले. देवीच्या या मनमोहक रूपामुळे मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
नंदादेवीचे स्वरूप चतुर्भुज असून, देवीच्या चार हातांमध्ये कमळ, अंकुश, पाश आणि शंख आहे.
नंदादेवीला नंदजा, कमला, इंदिरा आणि लक्ष्मी अशा विविध नावांनीही ओळखले जाते. देवीच्या या विविध नावांमधून तिच्या दैवी स्वरूपाचे महत्त्व अधोरेखित होते.
नंदादेवीचे स्तवन, पूजन आणि ध्यान केल्याने त्रैलोक्य वश होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात देवीच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाईच्या नंदादेवी रूपाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिभाव पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.