Shreya Maskar
कोजागिरी पौर्णिमा म्हटले की, चंद्राच्या प्रकाशात बसून गप्पांची मैफल रंगवणे आणि सुगंधी मसाला दुधाचा आस्वाद घेणे आले. स्वादिष्ट आणि पारंपरिक पद्धतीचे मसाला दूध बनवायची सोपी रेसिपी जाणून घ्या.
मसाला दूध बनवण्यासाठी दूध, साखर, बदाम, पिस्ता, काजू , चारोळी, वेलची पूड, केशर, जायफळ पूड आणि गुलाबाच्या पाकळ्या इत्यादी साहित्य लागते.
पारंपरिक मसाला दूध बनवण्यासाठी सर्वप्रथम जाड बुडाच्या पातेल्यात एक लिटर दूध घ्या. मध्यम आचेवर दूध उकळायला ठेवा. दूध उकळल्यानंतर गॅस मंद करून आटवून घ्या.
एका छोट्या वाटीत दोन चमचे गरम दूध घ्या. त्यात केशराच्या काड्या घालून काही मिनिटे भिजत ठेवा. यामुळे दुधाला सुंदर रंग आणि सुगंध येईल.
बदाम, पिस्ते आणि काजू बारीक चिरून घ्या. अधिक दाटसर चव हवी असल्यास काही बदाम आणि काजूची बारीक पूडही करू शकता.
आटवलेल्या दुधात साखर घालून ती विरघळू द्या. त्यानंतर केशराचे दूध, वेलची पूड, जायफळ पूड आणि चारोळी घाला.
आता चिरलेले बदाम, पिस्ते आणि काजू दुधात घाला. मंद आचेवर आणखी ३ ते ५ मिनिटे उकळू द्या, जेणेकरून सुकामेवा आणि मसाल्यांचा स्वाद दुधात छान मिसळेल.
तयार मसाला दूध ग्लासमध्ये ओता. वरून थोडे पिस्ते, बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवा. केशर थेट घालण्याऐवजी गरम दुधात भिजवून घातल्यास त्याचा रंग आणि सुगंध छान खुलतो.