Shreya Maskar
यंदा कोजागिरी पौर्णिमा रविवारी २५ ऑक्टोबर २०२६ ला आली आहे. कोजागिरीच्या रात्री दूध चंद्रप्रकाशात ठेवण्याची आणि नंतर ते प्राशन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. यामागचे नेमकं कारण, जाणून घेऊयात.
कोजागिरीच्या रात्री मसाला दूध, केशर-बदाम दूध किंवा वेलची घातलेले दूध पिण्याची प्रथा आहे. दूध हे प्रथिने आणि कॅल्शियमचे स्रोत आहे. त्यात बदाम, केशर किंवा वेलची घातल्याने चव आणि सुगंध वाढतो.
हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हटले जाते. या रात्री चंद्र विशेष तेजस्वी दिसतो. धार्मिक मान्यतेनुसार, या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृततुल्य ऊर्जा मिळते, अशी श्रद्धा आहे.
अनेक कुटुंबांमध्ये दूध एका स्वच्छ भांड्यात ठेवून ते चंद्रप्रकाशात ठेवले जाते. त्यानंतर कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन हे दूध पितात. ही परंपरा श्रद्धा, कौटुंबिक एकत्रिकरण आणि उत्सवाचा आनंद यांच्याशी जोडलेली आहे.
दुधातील प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक हे दुधाच्या मूळ रचनेवर अवलंबून असतात; चंद्रप्रकाशामुळे त्यात काही बदल होत नाही. कोजागिरीच्या निमित्ताने दूध पिणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे हे त्यामागचे कारण असू शकते.
उघड्या भांड्यात दूध ठेवल्यास त्यात धूळ, कीटक किंवा इतर दूषित घटक पडू शकतात, त्यामुळे दूध झाकून ठेवा. दूध खोलीच्या तापमानावर जास्त वेळ ठेवल्यास त्यात जंतू वाढू शकतात, त्यामुळे जास्त वेळ बाहेर ठेवू नका.
तुम्ही मसाला दूध हे दूध, साखर, बदाम, पिस्ता, काजू , चारोळी, वेलची पूड, केशर, जायफळ पूड आणि गुलाबाच्या पाकळ्या या साहित्यांचा वापर करून बनवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.