Shreya Maskar
स्वयंपाक घर स्वच्छ असले तर आरोग्याच्या समस्या जास्त उद्भवत नाही. तसेच घर प्रसन्न आणि आनंदी राहते. घरात सकारात्मकता नांदते. मात्र अनेकांच्या किचनमध्ये पसारा असतो. स्वयंपाकघर नीटनेटके ठेवण्याच्या टिप्स आताच जाणून घेऊयात.
किचनच्या ओट्यावर मोजक्याच वस्तू ठेवा, जेणेकरून तो मोठा आणि वापरण्यायोग्य दिसेल. मिक्सर, तेलाची बाटली किंवा रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू सोडून इतर काही ओट्यावर ठेवू नका.
स्वयंपाक घरात अशा असंख्य गोष्टी असतात ज्या आपण वापरत नाही, त्यावेळीच बाजूला काढा. तुटलेली भांडी, न वापरलेले डबे, रिकाम्या बाटल्या इतर आवश्यक नसलेल्या वस्तू काढून टाकल्यास कपाटात जागा मोकळी होते.
रात्री झोपण्यापूर्वी ओटा पुसणे, वापरलेली भांडी जागेवर ठेवणे आणि कचरा काढणे या छोट्या गोष्टी करा. रोज थोडा वेळ दिल्यामुळे स्वयंपाकघरात मोठा पसारा साचणार नाही.
सिंक आणि सिंकखालील जागा स्वच्छ करा. सिंकखाली स्वच्छतेची साधने आणि डिशवॉशिंग लिक्विड ठेवण्यासाठी स्वतंत्र ट्रे वापरा.
डाळी, तांदूळ, साखर, पोहे आणि इतर कोरडे पदार्थ हवाबंद डब्यांमध्ये ठेवा. डब्यांवर पदार्थाचे नाव आणि शक्य असल्यास खरेदीची तारीख लिहा. यामुळे पदार्थ चांगले राहतील.
मसाल्याचे डबे विशेषता नीट ठेवा. कारण किचनमध्ये लहान मुलांचा देखील वावर असतो. त्यांचा मसाल्यांना हात लागायला नको. तसेच ओलाव्यामुळे मसाले खराब देखील होतात. त्यामुळे ते स्वतंत्र डब्यात ठेवा.
महिन्यातून एकदा संपूर्ण किचन पाण्याने धुवून घ्या. चिकट झालेले पंखे, ओटा आणि खिडक्या स्वच्छ करा.