Shruti Vilas Kadam
कांदा-मेथी भजीसाठी २ कांदे, १ कप बारीक चिरलेली मेथी, १ कप बेसन, २ चमचे तांदळाचे पीठ, १ हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, ½ चमचा लाल तिखट, ½ चमचा जिरे, चिमूटभर हळद आणि मीठ घ्या.
एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा आणि मेथी घ्या. त्यात मीठ घालून दोन्ही हातांनी हलके मिक्स करा. काही मिनिटे ठेवल्याने कांदा आणि मेथीतून थोडा ओलावा बाहेर येईल.
आता त्यात बेसन, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे आणि हळद घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.
भजीच्या मिश्रणात गरजेनुसार अगदी थोडे पाणी घाला. मिश्रण खूप पातळ करू नका. घट्टसर मिश्रण असल्यास भजी अधिक कुरकुरीत होण्यास मदत होते.
कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल योग्य तापले आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडे मिश्रण तेलात सोडून पाहू शकता.
तयार मिश्रणाचे छोटे-छोटे भाग हाताने किंवा चमच्याने गरम तेलात सोडा. भजी मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तळलेली भजी टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या. गरमागरम कांदा-मेथी भजी चहा, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.