ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पिक घेतले जाते. चांगल्या आरोग्यासाठी ज्वारीचे अनेक फायदे आहेत. ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते.
ज्वारी सगळ्यांनाच आवडते असे नाही. पण ज्वारीच्या या पदार्थाची चव तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया. हा पौष्टिक आणि चमचमीत पदार्थ आहे तरी कोणता?
तुम्ही ज्वारीची भाकरी तर खाल्लीच असेल. पण ज्वारीच्या पिठाने बनलेली वरणफळं कधी खाल्ली आहेत का? ती कशी बनवायची ते पाहुया.
ज्वारीचं पिठ, गरम पाणी, मीठ, लाल तिखट, जीरं, मोहरी, कढिपत्ता, हिंग, कोकम किंवा चिंच, शिजलेली तुरीची डाळ, चकली प्रेस, इडली पात्र.
एक वाटी ज्वारीचं पिठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ, गरजेनुसार गरम पाणी घाला. पिठ चांगले मळून घ्या. मळलेल्या पिठाचा लांबसर गोळा करा.
एका इडली पात्राला तेल लावून घ्या. चकली प्रेसच्या मदतीने इडली पात्रात पिठाच्या शेवया पाडून घ्या. या शेवया १५ मिनिटे वाफवा.
एका पातेल्यात जीरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, लसून, आवडीनुसार लाल तिखट घालून फोडणी द्या. तुरीच्या डाळीचे वरण तयार करा. वरणात चवीनुसार मीठ आणि आंबटपणासाठी कोकम किंवा चिंच घाला.
ज्वारीच्या पिठाची फळं वरणात घाला. वरणाला २ मिनिटे उकळी येऊद्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तयार झालेली चमचमीत ज्वारीची वरणफळं गरम, मऊ भातासोबत सर्व्ह करा.
ज्वारी खाल्ल्याने आरोग्य तर चांगले राहतेच सोबतच वजन कमी करण्यासही मदत होते.