Surabhi Jayashree Jagdish
दिवसभर थोडं-थोडं कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होतं. पुरेसे द्रवपदार्थ घेतल्याने घट्ट झालेला कफ काही प्रमाणात पातळ होऊ शकतो. त्यामुळे बाहेर पडताना होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाक आणि घशातील मार्ग ओलसर राहण्यास मदत होते. त्यामुळे साचलेला कफ सैल झाल्यासारखा वाटू शकतो आणि नाक बंद होण्याचा त्रासही कमी होऊ शकतो. वाफ घेताना चेहरा गरम पाण्याच्या अगदी जवळ नेऊ नका.
आल्याचं कोमट पाणी किंवा आलं घातलेला चहा घशातील खवखव आणि अस्वस्थता कमी करतो. आले बारीक करून ते पाण्यात उकळून हे पेय तयार करता येतं. ते खूप गरम न पिता कोमट अवस्थेत घेतल्यास घशाला अधिक आरामदायक वाटतं.
कोमट पाण्यात थोडा मध मिसळून घेतल्याने खोकल्यामुळे होणारी घशाची खवखव कमी होण्यास मदत होऊ शकते. रात्री होणाऱ्या खोकल्यामुळे त्रास होत असल्यास मधाचा उपयोग केला जातो. मात्र एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना मध देऊ नये.
कोमट पाण्यात थोडं मीठ मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करा. यामुळे घशातील खवखव आणि कफामुळे जाणवणारी अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. गुळण्या करताना मिठाचं पाणी गिळू नका.
झोपताना डोकं आणि छातीचा वरचा भाग थोडा उंच राहील असं बघा. यासाठी अतिरिक्त उशीचा वापर करता येतो. मात्र मानेला अस्वस्थता होईल इतकी उंच उशी ठेवू नका. विशेषतः रात्री खोकला किंवा घशात कफ साचल्यासारखं वाटत असल्यास ही स्थिती आरामदायक ठरू शकते.
सिगारेटचा धूर, धूळ, अगरबत्तीचा धूर आणि तीव्र परफ्यूम यामुळे श्वसनमार्गाला त्रास होतो. त्यामुळे कफ आणि खोकल्याचा त्रास असताना अशा गोष्टींपासून शक्य तितकं दूर राहा.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.