Surabhi Jayashree Jagdish
अक्षय्य तृतीया म्हटलं की, घराघरात आमरसाचा खास बेत केला जातो. अनेकजण आमरसात दूध किंवा तूप घालतात, कारण त्याने चव छान लागते. पण आयुर्वेदानुसार खरंच दूध आणि आमरस एकत्र खाणं योग्य आहे का?
आमरस हा पारंपरिक पदार्थ असून काही भागात त्यात दूध आणि तूप घालण्याची पद्धत आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चव वाढवण्यासाठी दूध, तूप किंवा साखर घातली जाते.
आयुर्वेदानुसार काही फळे आणि दूध एकत्र खाल्ल्यास ते विरुद्ध आहार ठरू शकतात. आंबा हे उष्ण फळ आहे, तर दूध थंड गुणधर्माचं मानलं जातं. त्यामुळे काही तज्ञांच्या मते हा संयोग पचनावर परिणाम करू शकतो.
दूध घातल्यामुळे आमरस जड होतो आणि काही लोकांना पचनाचा त्रास होऊ शकतो. विशेषतः ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यांनी काळजी घ्यावी. जास्त प्रमाणात घेतल्यास अॅसिडिटी, गॅस किंवा अपचन होण्याची शक्यता असते.
तूप हे आयुर्वेदात पचनासाठी उपयुक्त मानलं जातं आणि ते सात्त्विक अन्न आहे. आमरसात थोड्या प्रमाणात तूप घातल्यास चव आणि पौष्टिकता वाढते. पण जास्त तूप घातल्यास ते जड होऊन पचनावर ताण येऊ शकतो.
जर तुम्हाला पोटाचे त्रास, अॅसिडिटी किंवा त्वचेच्या समस्या असतील तर हा संयोग टाळावा. रात्रीच्या वेळी दूध घातलेला आमरस खाणं टाळलं पाहिजे. लहान मुलं आणि ज्येष्ठांनीही प्रमाणातच सेवन करावं.
जर तुम्हाला पारंपरिक चव हवी असेल तर थोडं दूध किंवा तूप घालू शकता. पण हलका आणि पचायला सोपा आमरस हवा असेल तर फक्त आंब्याचा रस, थोडी साखर आणि वेलची वापरणं उत्तम.